
आपले आई-वडील हे प्रत्येकाला महत्वाचे असतात, त्यांच्यापैकी कोणाचंही छत्र हरपलं तर आयुष्यभर वेदना होत राहतात. त्यातूनही तो मृत्यू अकस्मात असेल किंवा अनपेक्षित असेल तर होणार दु:ख शब्दात व्यक्तही करता येत नाही. गोरेगामध्ये देखील असाच प्रकार घडला. एका अवघ्या 1 3 वर्षांच्या मुलीच्या डोक्यावरून वडिलांचं छत्र हरपलं, दुचाकीवरून पडल्याने तिच्या वडिलांचा मृत्यू झाला असं तिच्या आईने सांगितलं होतं, मात्र खरं प्रकरण दुसरंच काही होतं. अखेर या मुलीने धाडस दाखवलं आणि पोलिासंना खरी माहिती देऊन आपल्या वडिलांच्या हत्येचा कट उघडकीस आणला. त्यामुळे त्या इसमाचा मृत्यू दुचाकीवरून पडून नव्हे तर कट आखून त्याला मारण्याच आल्याचं उघड झालं. याप्रकरणी मुलीने दिलेल्या माहितीनंतर आरे पोलिसांनी त्या इसमाची पत्नी आणि तिच्या प्रियकराविरोधात गुन्हा दाखल केला.
काय आहे प्रकरण ?
मिळालेल्या माहितीनुसार, मृत भरत अहिरे (वय 40) हे रंगभूषा कलाकार होते, ते पत्नी राजश्री (वय 35) आणि दोन मुलांसह गोरेगावला रहात होते. त्यांची मोठी मुलगी 13 वर्षांची तर मुलगा 5 वर्षांचा आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजश्री यांचे परिसरात राहणाऱ्या चंद्रशेखर पडयाची नावाच्या व्यक्तीबरोबर अनैतिक संबंध होते. त्यामुळे पती भरत याचा काटा काढण्यासाठी राजश्री आणि चंद्रशेखर यांनी एक योजना आखली.
त्यानुसार चंद्रशेखर मला अश्लील संदेश पाठवून त्रास देतो, असे पत्नी राजश्रीने तिचा पती भरत यांना सांगितले. चंद्रशेखर हा त्यांच्या ओळखीचा होता , पत्नीच्या तक्रारीनंतर भरत यांनी चंद्रशेखर याला फोन करून याबाबत जाब विचारला. तेव्हा चंद्रशेखरने त्यांना भेटायला बोलावले.
अशी केली हत्या
15 जुलै रोजी रात्री 10 वाजता गोरेगाव पूर्वेच्या आरे कॉलनी मधील एकता नगर येथील सार्वजनिक शौचालयाजवळ ही भेट ठरली होती. तेथे भरत आणि राजश्री गेले. ठरलेल्या योजनेनुसार चंद्रशेखर आणि त्याचा एक रंगा नावाचा मित्राने भरत याला बेदम मारहाण केली. राजश्री पतीला रुग्णालयात न नेता घरी घेऊन आली. दुचाकीवरून पडल्याने अपघात झाला असे तिने शेजाऱ्यांना सांगितले. नंतर भरत यांचा मृत्यू झाला. अपघातामुळेच त्याचा जीव गेल्याचे सर्वांना वाटले, पण धक्कादायक गोष्ट म्हणजे मारहाणीचा हा सर्व प्रकार भरत यांच्या 13 वर्षांच्या मुलीने लांबून पाहिला होता.
आईने आणि तिच्या मित्राने मिळून बाबांची हत्या केल्याचे तिला माहीत होतं. अखेर तिने धाडस करत आरे पोलिसांना सर्व प्रकार सांगितला आणि गुन्ह्याचा उलगडा झाला.