संतापजनक ! मोबाईल चार्जर न दिल्याने तरूणीला बेदम मारहाण, अखेर बेशुद्ध..

रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या या तरूणीला शुल्लक कारणावरून बेदम मारहाण करण्यात आली. चार्जर दिला नाही म्हणून आरोपी व त्याच्या मित्रांनी तरूणीला निर्घृणपणे मारहाण केली. त्यामुळे ती बेशुद्ध होऊन खाली कोसळली. या प्रकरणावर संताप व्यापाऱ्यानी आरमोरी शहर आज बंद पुकारला आहे.

संतापजनक ! मोबाईल चार्जर न दिल्याने तरूणीला बेदम मारहाण, अखेर बेशुद्ध..
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Aug 20, 2024 | 10:06 AM

रेस्टॉरंटमध्ये नाश्ता करण्यास गेलेल्या महिलेने तेथे काम करणाऱ्या एका तरूणीकडे मोबाईल चार्जर मागितला, मात्र तो न मिळाल्याने त्या तरूणीला अमानुषपमे बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच ही घटना घडली असून त्यामुळे गडचिरोलीतील आरमोरी शहरामध्ये खळबळ माजली आहे. या प्रकरणी सोहेल शेख (वय ३०) व अयुब (वय ३०, दोघेही रा. आरमोरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून ते दोघेही फरार आहेत. ही संपूर्ण घटना रेस्टॉरंटच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या प्रकरणावर संताप व्यक्त करत व्यापाऱ्यांनी आरमोरी शहर आज बंद पुकारला आहे.

नेमकं घडलं तरी काय ?

मिळालेल्या माहितीनुसार, आरमोरी शहरातील देसाईगंज टी पाँईटवर शिवम रेस्टॉरंट आहे, तेथे हा धक्कादायक प्रकार घडला. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11च्या सुमारास ही मारहाण झाली. तेथील सीसीटीव्हीमध्ये सर्व प्रकार कैद झाला. पीडित तरूणी ही 19 वर्षांची असून काही काळापासून या रेस्टॉरंटमध्ये काम करत होती. 15 तारखेला आरोपी सोहेल हा त्याच्या पत्नीसह रेस्टॉरंटमध्ये डोसा खाण्यासाठी आला होता. कामानिमित्त तो काही काळ बाहेर गेला. तेव्हा त्याच्या पत्नीने सदर युवतीकडे मोबाईल चार्जर मागितला. मात्र तिने तिला चार्जर देण्यास नकार दिला, त्यावरून दोघींमध्ये वाद झाला. त्या महिलेने ही घटना पती सोहेल याला सांगितली. तो लगेच रेस्टरंटमध्ये आला आणि त्याने त्या तरूणीला बेदम मारहाण केली. तिचं डोकंही टेबलवर आपटलं.

मित्रानेही केली मारहाण

एवढंच नव्हे तर त्याने त्याचा मित्र अयुब यालाही तेथे बोलावलं आणि त्या दोघांनी त्या तरूणीला पुन्हा मारहाण केली. यामुळे ती तरूणी बेशुद्ध झाली. हा व्हिडीओ व्हायरल होताच संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी पीडित मुलीने पोलिसांत धाव घेत सर्व प्रकार कथन करत तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र ते दोघेही फरार झालेत. या घटनेमुळे शहरातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण असून अमानुष मारहाण करणाऱ्या आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी करण्यात येत आहे.