भुसावळमध्ये भाजप नगरसेवकाची निर्घृण हत्या, भाऊ, दोन मुलांनाही संपवलं, पत्नी गंभीर

भाजपचे नगसेवक रवींद्र बाबूराव खरात, त्यांचे थोरले बंधू सुनील बाबूराव खरात, मुलं सागर आणि रोहित उर्फ सोनू, मुलाचा मित्र सुमित गजरे यांचा गोळीबारात मृत्यू झाला. तर रवींद्र यांची पत्नी रजनी, तिसरा मुलगा हितेश यांच्यासह चौघं जण हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत.

भुसावळमध्ये भाजप नगरसेवकाची निर्घृण हत्या, भाऊ, दोन मुलांनाही संपवलं, पत्नी गंभीर

जळगाव : भाजप नगरसेवकाच्या कुटुंबातील चौघांसह पाच जणांच्या हत्याकांडामुळे (Bhusawal BJP Corporator Family Murder) भुसावळ हादरलं आहे. नगरसेवक रवींद्र खरात उर्फ हंप्या यांच्या कुटुंबावर हल्लेखोरांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात पाच जणांचा मृत्यू झाला. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर रविवारी रात्री घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे भुसावळ शहरात एकच खळबळ माजली आहे. हत्येप्रकरणी तिघा संशयितांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

भाजपचे 50 वर्षीय नगसेवक रवींद्र बाबूराव खरात, त्यांचे 55 वर्षीय थोरले बंधू सुनील बाबूराव खरात, 24 वर्षीय मुलगा सागर रवींद्र खरात आणि 20 वर्षीय मुलगा रोहित उर्फ सोनू रवींद्र खरात, मुलाचा मित्र सुमित गजरे यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला. तर रवींद्र यांची पत्नी रजनी, तिसरा मुलगा हितेश यांच्यासह चौघं जण हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत.

नगरसेवक रवींद्र खरात हे समता नगर येथे राहत होते. रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास काही हल्लेखोरांनी खरात यांच्या घराच्या अंगणात येऊन अंधाधुंद गोळीबार (Bhusawal BJP Corporator Family Murder) केला. त्यामुळे खरात यांच्या कुटुंबीयांची एकच धावपळ उडाली.

भुसावळमध्ये नगरसेवकाच्या कुटुंबावर बेछूट गोळीबार, तिघांचा मृत्यू

गोळीबारात खरात यांचे बंधू सुनील खरात आणि मुलगा सागर यांचा जागीच मृत्यू झाला. तर स्वत: रवींद्र खरात आणि त्यांचा दुसरा मुलगा रोहित यांना उपचारादरम्यान प्राण गमवावे लागले. रवींद्र खरात यांच्या पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन अधिक तपास सुरु केला आहे.

खरात कुटुंबावर दुसऱ्यांदा हल्ला

दरम्यान, यापूर्वीही खरात यांच्या घरावर जमावाने दगडफेक करत गोळीबार केला होता, अशी माहिती आता समोर आली आहे. त्यावेळी गावठी पिस्तूलातून हवेतून तीन फैरी झाडण्यात आल्या होत्या. परंतु तेव्हा खरात कुटुंब हल्ल्यातून थोडक्यात बचावलं होतं.

या प्रकरणात संशयित राजू उर्फ मोसिन शेख अजगर खान, मयुरेश सुरवाडे, शेखर मोघे या तिघांना अटक केल्याचं जळगाव पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले यांनी सांगितलं.

हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मात्र त्यामागे राजकीय हेतू आहे की वैयक्तिक हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे भुसावळमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *