Mahatma Phule : महात्मा फुलेंनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला, सत्यशोधक समाजाद्वारे सत्याचा मार्ग दाखवला,आजही त्यांचं कार्य प्रेरणादायी

महात्मा फुले यांनी पुण्यात मुलींच्या शिक्षणासाठी 1848 शाळामध्ये सुरु केली. मुलींच्या शिक्षणासाठी प्रथम सावित्रीबाई फुले यांना शिक्षण देत समाजसुधारणेची सुरुवात स्वत:पासून केली तर समाजात मोठा घडवता येतो हे महात्मा फुले यांनी दाखवून दिलं. सावित्रीबाई फुले यांना शिक्षण देत महात्मा फुले यांनी शाळा चालवल्या.

Mahatma Phule : महात्मा फुलेंनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला, सत्यशोधक समाजाद्वारे सत्याचा मार्ग दाखवला,आजही त्यांचं कार्य प्रेरणादायी
महात्मा जोतिबा फुले

मुंबई: महाराष्ट्राला देशभरात पुरोगामी राज्य म्हणून ओळखलं जातं. महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वाचा पाया क्रांतिसूर्य महात्मा फुले यांनी रचला. महात्मा फुले यांनी तत्कालीन समाजातील कर्मठ पुराणमतवाद्यांचा विरोध पत्कारत मुलींच्या शिक्षणासाठी शाळा सुरु केल्या आणि भारतातील स्त्री शिक्षणाचा पाया रचला. महात्मा जोतिबा फुले यांचे हे कार्य क्रांतिकारक ठरलं. महात्मा फुले यांनी पुण्यात मुलींच्या शिक्षणासाठी 1848 शाळामध्ये सुरु केली. मुलींच्या शिक्षणासाठी प्रथम सावित्रीबाई फुले यांना शिक्षण देत समाजसुधारणेची सुरुवात स्वत:पासून केली तर समाजात मोठा घडवता येतो हे महात्मा फुले यांनी दाखवून दिलं. सावित्रीबाई फुले यांना शिक्षण देत महात्मा फुले यांनी शाळा चालवल्या. महात्मा फुले यांचं सावित्रीबाई फुले यांच्या सक्रिय सहभागाच्या जोरावर स्त्री शिक्षणाचं आणि सामाजिक काम सुरु होतं. शुद्रातिशूद्र आणि स्त्रिया यांच्या दुःखमुक्तीचा आणि शोषणमुक्तीचा ध्यास जोतिबा फुले यांनी घेतला होता.

महात्मा फुलेंचा सावित्रीबाई यांच्याशी विवाह

महात्मा फुले यांच्या काळात मुला मुलींचं लग्न वयाच्या आठव्या वर्षी करण्यात येत होती. जोतिबा फुले यांच्यासाठी वधू निवडण्याची जबाबदारी सगुणाईब यांनी घेतली होती. पुणे सातारा रस्त्यावरील शिरवळ पासून नायगाव येथे असलेल्या खंडोजी नेवसे पाटील यांची ज्येष्ठ कन्या सावित्री यांच्याशी जोतिबा फुले यांचा विवाह 1840 मध्ये झाला. महात्मा फुले यांना चौफेर वाचनाची आवड होती. त्यांच्यावर थॉमस पेन यांच्या राईटस ऑफ मॅन आणि एज ऑफ रिझन या ग्रंथाचा प्रभाव होता.

त्या घटनेनं कलाटणी मिळाली

महात्मा फुले यांच्यासारख्या महापुरुषाच्या जीवनात एखादी घटना इतिहास निर्माण करणारी ठरते. 1848 मध्ये जोतिबा फुले यांच्या ब्राह्मण मित्राचं लग्न ठरलं होतं. त्याचं आमंत्रण जोतिबा यांना देखील मिळालं होतं. ते त्याच्या मिरवणुकीत सहभागी झाले होते. जोतिबांना वरातीतील इतर ब्राह्मणांनी ओळखलं.’हा कोण शूद्र कुणबट!’ अशी कुजबूज त्यावेळी सुरु होती. जोतिबा फुले यांना अपमानित करुन मिरवणुकीतून बाहेर काढण्यात आलं. या घटनेचा महात्मा फुलेंवर मोठा परिणाम झाला त्यांनी उच्च नीच भेदभाव, वर्णजातीअहंकार, विषमता नष्ट करण्याचा निर्धार केला.

स्त्री शूद्रातिशूद्राना शोषणातून बाहेर काढण्याचा मार्ग शिक्षण प्रसार

विद्येविना मति गेली | मतिविना नीति गेली||
नीतिविना गति गेली | गतिविना वित्त गेले ||
वित्ताविना शूद्र खचले| इतके अनर्थ एका अविद्येने केले||

या ओळींतमधून शिक्षणाशिवाय कष्टकरी, मजूर वर्गाची काय स्थिती होते. शिक्षण ही गोष्ट नसली तर काय होतं याची मांडणी महात्मा फुले यांनी वरील ओळींतून केली आहे. महात्मा फुले यांनी 1848 मध्ये शाळा सुरु केल्यानंतर त्यांना विरोधाला सामोरं जावं लागलं. अनेक कारण देत विरोध सुरु होता. महात्मा फुले यांना गोपाळबाबा वलंगकर, राणबा महार. लहुजी साळवे यांनी अस्पृश्य समाजात शिक्षणाबद्दल जागृती करण्यास मदत केली. मुलींना शिकवण्यासाठी ख्रिस्ती शिक्षिका चालणार नव्हती. जोतिबा फुले यांच्यासमोरील ही अडचण सावित्रीबाईंना समजली. सावित्रीबाईंनी स्वत: शिक्षिका होण्याती तयारी दाखवली. सुरुवातीचे काही दिवस महात्मा फुले यांनी त्यांना घरीच शिकवसं. त्यानंतर पुढे जोतिबा फुले यांचे मित्र केशवराव शिवराम भवाळकर-जोशी आणि यशवंत परांजपे यांच्यावर सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणाची जबाबदारी देण्यात आली. यानंतर सावित्रीबाई फुले यांनी अहमदनगर येथे मिसेस फरार आणि पुणे येथे मिसेस मिचेल यांच्या नॉर्मल स्कूलमधून अध्यापनाचे शिक्षण पूर्ण केलं. सावित्रीबाई फुले या देशातील पहिल्या प्रशिक्षित अध्यापिका आणि मुख्याध्यापिका ठरल्या, त्यांच्या सोबतचं फतिमा शेख या पहिल्या मुस्लीम प्रशिक्षित अध्यापिका आणि मुख्याध्यापिका ठरल्या.

महात्मा फुले यांची साहित्य संपदा

स्त्री शिक्षासासोबत अस्पृश्य समाजाच्या हक्कासाठी आणि उद्धारासाठी महात्मा फुले यांनी काम केल. महात्मा फुले यांनी विविध ग्रंथांचं लेखन देखील केलं आहे. ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, सत्सार, सार्वजनिक सत्यधर्म, अखंडादि काव्यरचना, छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पवाडा, हंटर शिक्षण आयोगापुढं सादर केलेल निवेदन, इशारा आणि तृतीयरत्न नाटक या पुस्तकांचं लेखन महात्मा फुले यांनी केलं.

मारेकऱ्यांचं मनपरिवर्तन

शिक्षण प्रसाराबरोबर इतरही सुधारणा कार्ये सुरू महात्मा फुले यांनी केली होती. महात्मा फुले यांच्या कार्याला पुण्यातून त्या काळी विरोध सुरु होता. समाजातील कर्मठ व्यक्तींनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला कडाडून विरोध केला होता. 1856 मध्ये महात्मा फुले यांना जिवे मारण्यासाठी मारेकरी पाठवण्यात आले होते. शूद्रातिशूद्र आणि स्त्रियांना विद्या मिळाली, ते जागृत झाले, ग्रंथ वाचू लागले तर त्यातील आपल्या लबाड्या उघड होतील. म्हणून जोतिबाचे सुधारणेचे खूळ बंद पाडलेच पाहिजे या विचारानं तत्कालीन समाजातील कर्मठ व्यक्तींनी महात्मा फुले यांना मारण्यासाठी मारेकरी पाठवले होते.

इ.स. 1856 साल होते.आपले क्रांतिकार्य अधिक सखोल, व्यापक आणि भक्कम कसे करावयाचे, याचा विचार जोतिबा करीत होते. मध्यरात्र उलटून गेली. बाहेर अंधाराचे साम्राज्य होते. घरात समईचा शांत आणि मंद प्रकाश पडला होता. ते प्रकाशकिरणत्या अंधाराला भेदण्याचा प्रयत्न करीत होते. नीरव शांतता होती. तेवढ्यात जोतिबांना कसलीतरी चाहूल लागली. यावेळी कोण झाले असावे. हातामध्ये नंग्या तलवारी घेतलेल्या दोन व्यक्ती त्यांच्यापुढे उभ्या राहिल्या. त्यांना पाहून जोतिबांच्या काळजात धस्स झाले. आणि जोतिबा जागेच असल्याचे पाहून ते मारेकरी गांगरून गेले. भेकड सनातन्यांना एखाद्याचा खून करण्याची हिंमत नव्हती. सुपारी देऊन पाठविलेले ते मारेकरी होते. जोतिबांनी अंदाज केला. धाडसाने, प्रेमळपणाने, कारूण्य भरल्या आवाजात त्यांनी विचारले, “तुम्ही कोण? कशासाठी येथे आलात?” “मला मारल्यामुळे तुमचा एवढा फायदा होणार असेल तर मला जरूर ठार मारा… माझे आयुष्यच दीनदलितांसाठी आहे” असं महात्मा फुले म्हणाले. महात्मा फुले यांना मारण्याची सुपारी पुण्यातील काही ब्राह्मणांनी दिल्याचं दोन्ही मारेकऱ्यांनी त्यांना सांगितलं होतं. जोतिबांचा शांत, सोज्वळ तरीही करारी चेहरा, निर्भयपणा, त्यांच्या डोळ्यातून ओसंडणारी करूणा, त्यांच्या बोलण्यातील मधाळपणा, यामुळे ते मारेकरी पश्चात्ताप झाले. जोतिबा फुले यांच्या मनाचा मोठेपणा पाहून ते प्रभावित झाले आणि महात्मा फुलेंच्या कार्यात सहभागी झाले. या मारेकऱ्यांपैकी एक धोंडिराम नामदेव कुंभार याने जोतिबा फुले यांच्याजवळ शिक्षण घेऊन, त्यांच्याच आज्ञेने काशी येथे जाऊन संस्कृत विद्या संपादन केली. पंडितराव हा बहुमानाचा किताब मिळविला. 12 फेब्रुवारी 1884 रोजी सातारा जिल्ह्यातील गोंदवले येथे शृंगेरी मठाच्या शंकाराचार्यांना आणि ब्रह्मवृंदांना वेदांवरील वादविवादामध्ये पराभूत केले. ‘सत्यशोधक समाजाची मते चांगली आहेत. सर्व समाजाने त्या समाजाचे अनुयायी व्हावे.’ अशी आज्ञा करणारा ताम्रपट; शिक्का आणि सहीसह त्यांनी दिला. पंडित धोंडिराम कुंभार यांनी सत्यशोधक समाजाचा प्रसार खूप धडाडीने केला. त्यांनी अखंड रचनाही केली आहे. दुसरा मारेकरी रोडे हा रामोशी होता. तो जोतिबा सावित्रीबाई यांचा अंगरक्षक बनला. त्याची सून सावित्रीबाई रोडे सत्यशोधक समाजाची अध्यक्षा झाली. सत्यशोधक समाजाचा विचार या कुटुंबाने पुढे दोन-तीन पिढ्यांत निष्ठेने जतन केला. मारेकऱ्यांचे हृदयपरिवर्तन घडून नव्या इतिहास निर्मितीला आणि ऐतिहासिक कार्याला चालना देणारा असा प्रसंग इतिहासात तरी अजोड आहे.

सत्यशोधक समाजाची स्थापना

महात्मा फुले यांच्या वाड्यासमोर मोठा हौद बांधलेला होता. त्यांनी अस्पृश्य समजासाठी 1868 मध्ये पाण्याचा हौद खुला केला. सर्व माणसे एकाच परमेश्वराची लेकरं आहेत ही मानवी भावना त्यामागं होती. तळागाळातील कष्टकरी शेतकरी, बलुतेदार आलुतेदार, भटके स्त्री पुरुष यांच्या दु:ख मुक्तीचा ध्यास महात्मा फुले यांनी घेतला होता. वर्णजातिव्यवस्था आणि स्त्री दास्याचा अंत झाल्याशिवाय हा समाज सामाजिक गुलामगिरीतून मुक्त होणार नाही, हे त्यांनी जाणलं होतं. आपल्या कार्यासाठी एक व्यापक संस्था असावी यासाठी महात्मा फुले यांनी 24 नोव्हेंबर 1873 ला सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्याचा शोध घेणे, सार्वजनिक सत्याचा आग्रह धरणे, सत्याचा अनेक बाजू, अनेक पैलू, अनेक शक्यता लक्षात घेणीर संस्था म्हणून सत्यशोधक समाज नाव निवडण्यात आलं. सर्व मनुष्य एकाच ईश्वराची लेकरे आहेत व तो सर्वांचा मायबाप आहे. आईला विनवण्यास किंवा बापाला संतुष्ट करण्यास लेकराला जशी मध्यस्थाची गरज नसते, तसेच भक्तांना ईश्वराची ओळख करुन देण्यासाठी व परस्नन करुन घेण्यासाठी उपाध्याय किंवा धर्मगुरु असल्या मध्यस्थाची जरुरी नाही हे सत्यशोधक समाजाचं तत्वं होतं.

1887 नंतरचा काळ महात्मा फुले यांना आजारांना तोंड द्यावं लागलं. सावित्रीबाई फुले यांनी त्यांची खूप शुश्रषा केली. डॉ. खोले यांनी त्यांच्यावर उपचार केले. महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी देखील महात्मा फुलेंना मदत केली होती. मृत्यूपूर्वी ते दोन महिने आजारीचं होते. 28 नोव्हेंबर 1890 रोजी महात्मा फुले यांचं निधन झालं. क्रांतीसूर्य जोतिबा फुले आज आपल्यासोबत नसले तरी स्त्री शिक्षणासाठी केलेल्या कार्याच्या रुपानं, त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या रुपानं, विचारांच्या रुपानं ते जिवंत आहेत. त्यांचे विचार आणि कार्यक्रम हेच मार्गदर्शक आहेत.

इतर बातम्या:

पाणीपुरवठा बंद असल्याने आज नाशिककरांची निर्जळी; उद्याही कमी दाबाने पाणी, जलवाहिन्यांची दुरुस्ती सुरू

जोपर्यंत विलीनीकरण नाही, तोपर्यंत संप मागे नाही, एसटी कर्मचाऱ्यांचा लढा सुरूच राहणार: गुणरत्न सदावर्ते

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI