NEET PGच्या परीक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; नवीन अपडेट काय?
वैद्यकीय शिक्षणासाठी घेण्यात येणाऱ्या नीट पीजी परीक्षेबाबतचा सस्पेन्स संपला आहे. या परीक्षा दोन सत्रात व्हाव्यात म्हणून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. कोर्टाने ही याचिका निकाली काढली आहे. या संदर्भात कोर्टाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. हा निर्णय देताना कोर्टाने पारदर्शकतेवरही बोट ठेवलं आहे.

नीट पीजी 2025च्या परीक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. नीट पीजी 2025च्या परीक्षा देशभरात विविध केंद्रावर एकाच शिफ्टमध्ये होणार आहेत. तसा निर्णयच सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. नीट पीजीच्या परीक्षा एकाच शिफ्टमध्ये घ्या. त्यामुळे पारदर्शकता राहील आणि सर्व उमेदवारांना समान संधी मिळेल, असं कोर्टाने म्हटलं आहे. नीट पीजीची परीक्षा दोन शिफ्टमध्ये करण्यासाठीची याचिका कोर्टात दाखल करण्यात आली होती. यावेळी कोर्टाने एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. येत्या 15 जून रोजी ही परीक्षा होणार आहे.
यावेळी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात भाष्य केलं आहे. दोन सत्रांमध्ये परीक्षा घेतल्यास प्रश्नांच्या कठीणतेच्या स्तरात फरक होऊ शकतो, ज्यामुळे असमानता आणि मनमानीची स्थिती निर्माण होऊ शकते, असं कोर्टाने स्पष्ट शब्दात सांगितलं आहे. कोणत्याही दोन प्रश्नपत्रांच्या कठीणतेच्या स्तराला कधीही पूर्णपणे समान म्हणता येत नाही. म्हणूनच एकसमान निकष सुनिश्चित करण्यासाठी परीक्षा एकाच सत्रात घेणे आवश्यक आहे, असंही कोर्टाने म्हटलं आहे.
अजूनही वेळ आहे
15 जून रोजी होणाऱ्या परीक्षेची आवश्यक तयारी करण्यासाठी अजूनही वेळ आहे, असंही कोर्टाने म्हटलं. परीक्षा मंडळाकडे परीक्षा केंद्र ठरवण्यासाठी अजूनही पुरेसा वेळ आहे, असंही कोर्टाने म्हटलं आहे. त्यामुळे दोन शिफ्टमध्ये परीक्षा होणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
NEET PG 2025 : एक्झाम सिटी स्लिप कधी मिळणार?
नीट पीजी परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना एक्झाम सिटी स्लिप 2 जून रोजी मिळणार आहे. सिटी स्लिप अधिकृत संकेतस्थळावर जारी करण्यात येणार नाही. राष्ट्रीय आयुर्विज्ञान परीक्षा बोर्ड उमेदवारांचे रजिस्टर्ड ईमेल आयडीवर सिटी स्लिप पाठवेल. ते विद्यार्थ्यांनी डाऊनलोड करायचे आहेत.
NEET PG 2025 Admit Card : अॅडमिट कार्ड कधी मिळणार?
अॅडमिट कार्ड परीक्षेच्या तारखेच्या चार दिवस आधी जारी केलं जाणार आहे. परीक्षा बोर्डाची अधिकृत वेबसाईट natboard.edu.in वर अॅडमिट कार्ड मिळले. अर्ज क्रमांक आणि जन्म तारीख टाकून उमेदवारांना अॅडमिट कार्ड डाऊनलोड करता येणार आहे. हॉल तिकीट शिवाय कोणत्याही उमेदवाराला परीक्षा केंद्रात प्रवेश मिळणार नाही, हे उमेदवारांनी लक्षात ठेवावं.
