ठाणे : बदलापूरच्या आश्रमशाळेत राहणाऱ्या शबाना शेख (Shabana Shaikh) या विद्यार्थिनीनं एमबीबीएसला (MBBS) प्रवेश मिळवलाय. तिच्या या यशाबद्दल ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर (Rajesh Narvekar) यांनी तिचा सत्कार केला. शबानाच्या या यशाबद्दल सध्या तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.शबाना शेख ही विद्यार्थिनी बदलापूरच्या बॉम्बे टीन चॅलेंज या संस्थेच्या आश्रमशाळेत राहते. शबाना चार वर्षांची असताना ती या संस्थेच्या स्वयंसेवकांना मुंबईच्या जेजे हॉस्पिटलमध्ये सापडली होती. तेव्हापासून ती याच आश्रमशाळेत वास्तव्याला आहे. या आश्रमशाळेत राहून तिनं बदलापूरच्या आयईएस कात्रप विद्यालयातून दहावीपर्यंतचं शिक्षण घेतलं. तर पुढे अंबरनाथच्या साऊथ इंडियन कॉलेजमधून तिनं विज्ञान शाखेतून 12 वी पर्यंतचं शिक्षण घेतलं. त्यानंतर ‘नीट’ ही प्रवेशपरीक्षा देऊन तिनं जिद्दीनं एमबीबीएसला प्रवेश मिळवला.