प्रत्येक कुटुंबाला हेलिकॉप्टर, दरवर्षी एक कोटी देणार, चंद्रावरही नेणार; अपक्ष उमेदवाराची आश्वासनांची खैरात

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 6 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. (independent Candidate Is Promising Helicopters And A Trip To Moon)

प्रत्येक कुटुंबाला हेलिकॉप्टर, दरवर्षी एक कोटी देणार, चंद्रावरही नेणार; अपक्ष उमेदवाराची आश्वासनांची खैरात
Thulam Saravanan

चेन्नई: तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 6 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी सर्वच उमेदवारांनी जोर लावला आहे. काही उमेदवारांनी तर स्वत:चा जाहीरनामाच प्रसिद्ध केला आहे. मात्र एका उमेदवाराचा जाहीरनामा सध्या तामिळनाडूत चर्चेचा विषय बनला आहे. त्याने नुसती आश्वासनांची खैरात केली नाही तर मतदारांना आकाशात उडायलाही भाग पाडलं आहे. (independent Candidate Is Promising Helicopters And A Trip To Moon)

या अपक्ष उमेदवाराचं नाव आहे थुलम सरवनन असं आहे. ते तामिळनाडूच्या मदुराई विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. या जागेवर एकूण 13 जण उभे आहेत. थुलम यांनी या निवडणूक प्रचारात जोर धरला आहे. पण त्यांच्या जाहीरनाम्याने ते अधिकच चर्चेत आले आहेत. त्यांनी विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक घराला मिनी हेलिकॉप्टर आणि आयफोन देणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. तसेच मतदारसंघातील मतदारांना प्रत्येक वर्षी एक कोटी रुपये देण्याचं आश्वासनही दिलं आहे. पण एवढी आश्वासने दिल्यानंतरही थुलम थांबले नाहीत. त्यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकत मतदारांना थेट आसमानातच नेलं आहे. थुलम यांनी मतदारांना चंद्रावर घेऊन जाण्याचंही आश्वासन दिलं आहे. त्यांचा हा जगावेगळा जाहीरनामा पाहून तर मतदार उडालेच आहेत.

बर्फाचा डोंगर उभारणार

थुलम यांनी केवळ एवढीच आश्वासने दिली नाहीत, तर त्यांनी आणखीही अविश्वसनीय आश्वासने दिली आहेत. विधानसभा मतदारसंघात स्पेस रिसर्च सेंटर, एक रॉकेट लॉन्च पॅड, मतदारसंघात गारवा निर्माण करण्यासाटी 300 फूट उंच कृत्रिम डोंगर उभारण्याचं आश्वासनही त्याने दिले आहेत. तसेच घरकाम करणाऱ्या महिलांचा बोझा कमी करण्यासाठी त्यांना एक रोबोट देण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं आहे.

कचऱ्याची पेटी निवडणूक चिन्ह

पत्रकार असलेल्या थुलमने निवडणुकीच्या मैदानात उतरण्यामागचं कारणही वेगळंच आहे. राजकीय पक्षांकडून नागरिकांना मोफत वस्तू मिळाल्या पाहिजेत. त्यासाठी नागरिकांमध्ये जागृकता निर्माण व्हावी या हेतूने मी निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहे. तसेच नागरिकांनी चांगल्या उमेदवारांना निवडून द्यावं हाही यामागचा हेतू असल्याचं त्यांनी सांगितलं. थुलम यांचं निवडणूक चिन्ह कचऱ्याची पेटी आहे. तुम्ही जर न मिळणाऱ्या आश्वासनांना भुलून जाऊन मतदान करणार असाल तर तुमचं मत कचरापेटीत टाका, असा त्यामागचा हेतू आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

अर्ज भरण्यासाठी उसने पैसे घेतले

थुलम हे वयोवृद्ध आई-वडिलांसोबत राहतात. मतदारांना चंद्रावर फिरून आणण्याचं आश्वासन देणाऱ्या थुलम यांनी मात्र उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 20 हजार रुपये व्याजावर घेतले आहेत. त्यामुळे व्याजावर पैसे घेणाऱ्या आणि चंद्रावर नेण्याचं आश्वासन देणाऱ्या या उमेदवाराला मतदार निवडून देतात का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. (independent Candidate Is Promising Helicopters And A Trip To Moon)

 

संबंधित बातम्या:

‘या’ नेत्याला ‘तामिळनाडूचे ठाकरे’ का म्हणतात माहीत आहे का?

तामिळनाडूत कामराज, आसाममध्ये गोगोई आणि बंगालमध्ये प्रणवदा; वाचा, काँग्रेस नेत्यांना भाजपने कसे केले हायजॅक!

रण तामिळनाडूचे! बिगूल वाजला; पण सत्ता कुणाला मिळणार?; वाचा स्पेशल रिपोर्ट

(independent Candidate Is Promising Helicopters And A Trip To Moon)