
दोन दिवसांपूर्वी लोकसभा निवडणूक 2024 चे निकाल जाहीर झाले. महाराष्ट्रात महायुतीचा दारुण पराभव झाला. महाविकास आघाडीने 30 जागा जिंकल्या. महायुतीला फक्त 17 जागांवर समाधान मानाव लागलं. या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मुंबईत तसेच राज्यात काही मतदारसंघात सेना विरुद्ध सेना असा सामना होता. मुंबईत मविआने चार तर महायुतीने दोन जागा जिंकल्या. मुंबई हा ठाकरे गटाचा बालेकिल्ला समजला जातो. यात दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि ईशान्य मुंबईची जागा ठाकरे गटाने जिकंली. फक्त उत्तर पश्चिम मुंबईत शिंदे गटाचे रवींद्र वायकर अवघ्या 48 मतांनी निवडून आले. मुंबईत तीन जागा जिंकून ठाकरे गटाने आपल वर्चस्व अबाधित राखल असलं तरी वरळीतल मताधिक्क्य चिंता वाढवणार आहे.
वरळी हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मुलगा आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ आहे. वरळी मतदारसंघ दक्षिण मुंबईत येतो, जिथून ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांनी निवडणूक जिंकली. दक्षिण मुंबईत ठाकरे गटाचे अरविंद सावंत विरुद्ध शिंदे गटाच्या यामिनी जाधव असा सामना होता. अरविंद सावंत मागच्या दोन टर्मपासून खासदार आहेत. यामिनी जाधव भायखळ्यातून आमदार आहेत. सावंत यांच्या तुलनेत यामिनी जाधव मतदारसंघात तितका ओळखीचा चेहरा नव्हता. अरविंद सावंत यांनी बाजी मारली. पण वरळीतून त्यांना फार मोठ मताधिक्क्य मिळालं नाही. ही चिंतेत टाकणारी बाब आहे.
भाजपा वरळीत पूर्ण ताकदीने लढणार हे स्पष्ट
लोकसभेच्या निकालानंतर आता भाजपाने वरळीत बॅनरबाजी सुरु केलीय. भाजपाने मतदारांचे आभार मानणारे बॅनर लावले आहेत. वरळीमधून यंदा महाविकास आघाडीचे उमेदवार अरविंद सावंत यांना 64 हजार मतं पडली, तर भाजप सेनेच्या यामिनी जाधव यांना 58 हजार मतं मिळाली. अरविंद सावंत यांना वरळीतून फक्त 6,715 मतांचा लीड मिळालं. सहा महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा विचार करताना ठाकरे गटाला ही चिंतेत टाकणारी बाब आहे. भाजपाने जे बॅनर लावलेत, त्यावर लोकसभेची कसर विधानसभेला भरुन काढू असं लिहिलय. या बॅनरवरुन भाजपा वरळीचा गड सर करण्यासाठी पूर्ण ताकदीने उतरणार हे स्पष्ट आहे.