
लोकसभा निवडणूक 2024 चे निकाल हाती आले असून जनतेने कौल दिला आहे. भाजपाप्रणित एनडीने बहुमतासाठी आवश्य असलेल्या 272 पेक्षा अधिक जागा मिळवल्या आहेत. पण भाजपला स्वबळावर बहुमतापेक्षा अधिक जागा मिळवता आलेल्या नाहीत. 2014 आणि 2019 साली भाजपने अनुक्रमे 282 आणि 303 जागा मिळवल्या होत्या. मात्र यावेळी निकाल वेगळा आहे. याच पार्श्वभूमीवर आज दिल्लीत घडामोडीना वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी कॅबिनेट बैठक बोलवली असून आजच्या बैठकीत राजीनामा देण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
औपचारिकता म्हणून हा राजीनामा देण्यात येईल, त्यानंतर पुढील निर्णय होईपर्यंत राष्ट्पती त्यांना काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कार्यभार पाहण्याची सूचना करू शकतात. या नंतर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडी सत्तास्थापनेसाठी औपचारिक दावा करण्याची शक्यता आहे.
राजधानीत घडामोडींना वेग
भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची काल मित्र पक्षांशी चर्चा झाली. अमित शाह यांनी फोनवरून एनडीए मधील सर्व मित्र पक्षांची चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली सर्व पक्ष सरकार स्थापन करण्यास तयार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज राजधानी दिल्लीमध्ये एनडीएची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी बिहारमधील जनता दल युनायटेडचे नितीश कुमार आणि आंध्र प्रदेशातील तेलगु देसम पक्षाचे चंद्राबाबू नायडू यांनाही या बैठकीसाठी बोलावण्यात आलं आहे. आज एनडीएच्या संयोजक पदावर चर्चा होणार असून आजच्या बैठकीत शपथविधीवर पण चर्चा होवू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
तर इंडिया आघाडीची देखील आज संध्याकाळी बैठक होणार आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी आज इंडिया आघाडीची बैठक होणार असून विरोधी पक्षात बसायचं की, सरकार स्थापनेचा दावा करायचा? याची रणनिती ठरु शकते. संध्याकाळी होणाऱ्या या बैठकीसाठी सगळ्या घटक पक्षांना निमंत्रण देण्यात आलं आहे. बैठकीत पंतप्रधान पदाच्या चेहऱ्यावर चर्चा होणार असल्याचे वृत्त आहे.
मोदींचा शपथविधी कधी ?
एनडीएला बहुमत मिळाल्याने देशभरात जल्लोष सुरू आहे. मात्र मागच्या दोन टर्मप्रमाणे यावेळी देशाने कुठल्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत दिलेलं नाही. पण भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने 292 जागा जिंकल्या आहेत.तर काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडीने 234 जागांवर विजय मिळवला. मात्र सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेला 272 ही मॅजिक फिगर एनडीएने पार केल्याने ते सत्तास्थापनेसाठी दावा करतील. दरम्यान मोदी सरकारच्या शपथविधीसंदर्भात महत्वाची माहिती समोर आली आहे. येत्या 9 जूनला (रविवार) मोदी सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती भवनाने काही महत्वाची पावलं उचलली आहे. त्यामुळे आजपासून 9 जूनपर्यंत राष्ट्रपती भवन सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद राहणार आहे. शपथविधी झाल्यानंतरच राष्ट्रपती भवन खुले केले जाईल. येत्या 9 जूनला मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
राष्ट्रपतींकडून डिनरचं आयोजन
लोकसभा निवडणूक 2024 चे निकाल हाती आल्यानंतर आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याकडून डिनरचं आयोजन करण्यात आलं आहे. रात्री 8 वाजता हा समारोपिय डिनर असेल. नरेंद्र मोदी यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे अनेक वरिष्ठ मंत्री या डिनरला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
इटलीच्या पंतप्रधानांनी केलं मोदींचं अभिनंदन
18 व्या लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आणि भाजपाप्रणीत एनडीने बहुमत मिळवल्यानंतर देशभरात जल्लोष झाला. मोदींनी विजयाची हॅटट्रिक केल्यानंतर जगभरातील नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केलं. NDA ला बहुमत मिळाल्यानंतर इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी ट्विट करून नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या. तसेच मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मोईजू यांनीही ट्विट करून पंतप्रधान मोदींची अभिनंदन केले.
Congratulazioni a @narendramodi per la nuova vittoria elettorale e i miei auguri più affettuosi di buon lavoro. Certa che continueremo a lavorare insieme per rafforzare l’amicizia che unisce Italia e India e consolidare la cooperazione sui diversi temi che ci legano, per il… pic.twitter.com/v5XJAqkwOz
— Giorgia Meloni (@GiorgiaMeloni) June 4, 2024