शाहू महाराज, आंबेडकर यांना पाठिंबा, पण 9 मतदारसंघात उमेदवार; प्रकाश शेंडगे यांची मोठी खेळी

| Updated on: Mar 29, 2024 | 9:14 PM

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि ओबीसी बहुजन पार्टीचे नेते प्रकाश शेंडगे यांच्यात अद्याप युती झाली नाही. आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीनुसार स्वत: प्रकाश आंबेडकर हे अकोल्यातून उभे राहणार आहेत.

शाहू महाराज, आंबेडकर यांना पाठिंबा, पण 9 मतदारसंघात उमेदवार; प्रकाश शेंडगे यांची मोठी खेळी
prakash shendge
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि ओबीसी बहुजन पार्टीचे नेते प्रकाश शेंडगे यांच्यात अद्याप युती झाली नाही. आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीनुसार स्वत: प्रकाश आंबेडकर हे अकोल्यातून उभे राहणार आहेत. वंचित पाठोपाठ ओबीसी बहुजन पार्टीनेही नऊ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार पक्षाचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे स्वत: सांगलीतून निवडणूक लढवत आहेत. शेंडगे यांनी ही यादी जाहीर करताना मोठा निर्णय जाहीर केला आहे. कोल्हापुरातील उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांना आणि अकोल्यातील उमेदवार प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे ओबीसी-दलित ऐक्याची ही वाटचाल असल्याचं मानलं जात आहे.

प्रकाश शेंडगे यांनी नऊ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार शेंडगे हे सांगलीतून लढणार आहेत. बारामतीतून महेश भागवत, परभणीतून ॲड. हरिभाऊ शेळके, हिंगोलीतून ॲड. रवी यशवंतराव शिंदे, नांदेडमधून ॲड. अविनाश भोसीकर, बुलढाण्यातून नंदू लवंगे, शिर्डीतून डॉ. अशोक आल्हाट यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर हातकणंगलेमधून मनीषा डांगे किंवा प्रा. संतोष कोळेकर यांना उमेदवारी दिली जाणार आहे.

सोशल इंजीनिअरिंग

प्रकाश शेंडगे यांनी पहिल्या यादीतून सोशल इंजीनिअरिंग साधण्याचा प्रयत्न केला आहे. ओबीसी, मराठा आणि दलित यांची मोठ बांधण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच कोल्हापुरातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती आणि अकोल्यातील वंचितचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा देऊन सामाजिक समीकरणावरही भर दिला आहे. मात्र, या सोशल इंजीनिअरिंगचा शेंडगे यांना कितपत फायदा होतो हे मतदानाच्या दिवशीच कळणार आहे.

तिसरी आघाडी होणार?

दरम्यान, प्रकाश शेंडगे यांनी राज्यात तिसरी आघाडी होणार असल्याचं सूतोवाच केलं होतं. प्रकाश आंबेडकर यांनीही राज्यात 2 एप्रिल रोजी भाजपविरोधी आघाडी होणार असल्याचं म्हटलं आहे. त्याच दिवशी सर्व काही चित्र स्पष्ट होणार असल्याचंही आंबेडकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राज्यात तिसरी आघाडी होणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. मात्र, या आघाडीत प्रकाश शेंडगे असतील की नाही? याबाबतचं चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही.