Uddhav Thackeray: आता किसिंग नको, चक्की पिसिंग करावं! त्या घोटाळ्यावरून उद्धव ठाकरेंनी घेरलं, म्हणाले, फडणवीस यांनी माफी…
Uddhav Thackeray: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकताच टीव्ही9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत अनेक विषयांवर भाष्य केले. त्यांनी थेट आता किसिंग नको, चक्की पिसिंग करावं असे म्हटले आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका आरोपावरुन अजित पवारांची माफी मागावी असे देखील म्हटले आहे.

महाराष्ट्रात सध्या महापालिका निवडणुकीसाठी प्रचार निर्णायक टप्प्यात आला आहे. राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी स्थानिक नेत्यांना अधिकार दिले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी उलट्यासुलट्या युती आणि आघाड्या झाल्या आहेत. मित्र एकमेकांचे शत्रू म्हणून लढताना दिसत आहेत. तर काही ठिकाणी अनेक वर्षापासूनचे एकमेकांचे शत्रू मित्र म्हणून लढताना दिसत आहे. दरम्यान, टीव्ही 9 मराठीचे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. त्यांनी काँग्रेस आणि आमचं विसर्जन झालं नाही असे म्हटले आहे. तसेच सत्तेत असूनही एकमेकांवर घोटाळ्याचे आरोप करत आहेत असे मत मांडले आहे.
“काँग्रेस आणि आमचं विसर्जन झालं नाही”
उद्धव ठाकरे म्हणाले की, काँग्रेस आणि आमचं विसर्जन झालं नाही. काँग्रेस त्यांचा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे. मी माझा. आम्ही एकमेकांबद्दल विरोधात बोलत नाही. काँग्रेसने का निर्णय घेतला हे मला अजून कळलं नाही. राज ठाकरेंबद्दल ते बोलले नाही. राज ठाकरे आणि आम्ही एकत्र येणं हा आमचा निर्णय आहे. मविआचा बळी गेला असं मानू थोडावेळ. महायुतीत अजित पवार त्यांच्यावर बोलतात. गणेश नाईक बोलतात. भाजपच्या लोकांनी पन्नास खोकेच्या घोषणा दिल्या. हे एकमेकांच्या उरावर बसले. आम्ही तर तसं केलं नाही ना. ते सत्तेत असूनही एकमेकांवर घोटाळ्याचे आरोप करत आहेत.
“किसिंग नको आता चक्की पिसिंग करावं”
पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, यालाच म्हणतात पारदर्शक कारभार. सभ्य भाषेत बोलायचं तर नंगानाच. निर्लज्जपणे एकमेकांचे कपडे फाडत आहेत. ७० हजार कोटींचा आरोप खोटा असेल तर अजित पवारांची माफी मागावी. खरा असेल तर किसिंग नको आता चक्की पिसिंग करावं. त्यांनी सांगितलं असेल. आम्ही सत्तेसाठी भाऊ एकत्र आलो. तसे हे जेवायला आले असतील. पुणेरी मिसळ खायला आले असतील. पुरणपोळ्या खायला आले असतील. हे सत्तेसाठी वाट्टेल ते करतील. विकृत नगरसेवक तुषार आपटे केला. कुणाचा कार्यकर्ता आहे. तो सेनेगरला जामीन मिळतो. हे बालत्काऱ्यांचा सत्कार करतात.
“भाजपमधून अजितपवारांवर आरोप सुरू झाले”
दादा आणि भाजपचं लागलं. आता ही नुरा कुस्ती आहे हे आतापर्यंत दिसतं. पण या निवडणुकीत वेगळंपण दिसतं. दोन पवारांचं एकत्रिकरण दिसतं. दुसऱ्या बाजूला महेश लांडगे आरोप करत आहेत. आजपर्यंत भाजपने अजित पवारांवर ब्र काढला नव्हता. फडणवीस काही बोलत नाही. कारण त्यांच्या अंगलट आलं आहे. भाजपला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांसोबत मी जात नाही. भाजपमधून अजितपवारांवर आरोप सुरू झाले. अजित पवार त्यांच्यावर बोलत आहेत. अंबरनाथमध्ये भाजपने काँग्रेस सोबत युती केली. अकोटमध्ये भाजप एमआयएमसोबत युती केली. आणि परभणीत शाह सेनेने एमआयएम सोबत गेले.
