UP Election 2022: भीम आर्मी-समाजवादी पार्टीचं उत्तर प्रदेशात फिस्कटलं, चंद्रशेखर आजाद यांचा अखिलेश यादवांवर हल्लाबोल

उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि भीम आर्मीत आघाडी होणार नाही. अखिलेश यादव यांनी भीम आर्मीला केवळ एकच जागा देऊ केल्याने भीम आर्मीने सपाबरोबर आघाडी न करण्याचा निर्णय घेतला आहे.

UP Election 2022: भीम आर्मी-समाजवादी पार्टीचं उत्तर प्रदेशात फिस्कटलं, चंद्रशेखर आजाद यांचा अखिलेश यादवांवर हल्लाबोल
chandra shekhar azad
| Edited By: | Updated on: Jan 15, 2022 | 11:16 AM

लखनऊ: उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि भीम आर्मीत आघाडी होणार नाही. अखिलेश यादव यांनी भीम आर्मीला केवळ एकच जागा देऊ केल्याने भीम आर्मीने सपाबरोबर आघाडी न करण्याचा निर्णय घेतला आहे. आघाडीची चर्चा फिस्कटल्यानंतर भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आजाद यांनी अखिलेश यादवांवर टीका केली आहे. अखिलेश यांना दलित मतांची गरज नसल्याचा टोला चंद्रशेखर आजाद यांनी लगावला आहे.

चंद्रशेखर आजाद यांनी पत्रकार परिषद घेऊन समाजवादी पार्टीशी आघाडी होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. 85 टक्के बहुजन समाज एकत्र यावा म्हणून आम्ही अखिलेश यादव यांच्यावर विश्वास दाखवला होता. त्यांच्याशी आम्ही आघाडी करण्याबाबत गेल्या सहा महिन्यांपासून चर्चा करत होतो. आमचे मुद्दे त्यांच्यासमोर मांडले. पदोन्नतीत आरक्षणासह मुस्लिम आरक्षणासह विविध मुद्द्यांवर त्यांच्याशी चर्चा केली. आताही एक महिना त्यांच्याशी आघाडीवर चर्चा केली. मात्र, अखिलेश यादव यांना आघाडीत दलित समाज नको होता. त्यामुळेच त्यांच्याशी आघाडी होऊ शकली नाही, असं चंद्रशेखर आजाद यांनी सांगितलं.

अखिलेश यादव यांनी अपमान केला

भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी आम्ही अनेक प्रयत्न केले. पण अखिलेश यादव यांना दलितांची मते हवी आहेत. मात्र, त्यांना आघाडीत दलित नकोय. दलित नेतेही त्यांना आघाडीत नको आहेत हे माझ्या लक्षात आलं आहे. एक महिना दहा दिवसानंतर त्यांनी काल आम्हाला अपमानित केलं. त्यांनी बहुजन समाजातील लोकांचा काल अपमान केला. आघाडीत आम्हाला केवळ एकच जागा देऊ केली होती. त्यामुळे आम्ही त्यांच्याशी आघाडी न करण्याचा निर्णय घेतला आहे, असं आजाद यांनी स्पष्ट केलं.

सपाला फटका बसणार?

संपूर्ण उत्तर प्रदेशात जाट समाजाची लोकसंख्या 4 टक्के आहे. तर पश्चिमी यूपीत जाट समाजाची लोकसंख्या 20 टक्के आहे. तर मुस्लिमांची लोकसंख्या 30 ते 40 टक्के आहे. तसेच दलितांची लोकसंख्या 25 टक्के आहे. त्यामुळे भीम आर्मीशी आघाडी न झाल्याने समाजवादी पार्टीला मोठा बसणार असल्याचं सांगितलं जात आहे.

403 जागांसाठी मतदान

उत्तर प्रदेशात एकूण 403 जागा आहेत. राज्यात सात टप्प्यात मतदान होणार आहे. या टप्प्यानुसार 10 फेब्रुवारी, 14 फेब्रुवारी, 20 फेब्रुवारी, 23 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी, 3 मार्च आणि 7 मार्च रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीचे निकाल 10 मार्च रोजी जाहीर होणार आहेत.

 

संबंधित बातम्या:

Assembly Elections 2022: निवडणूक रॅली, सभांवरील मनाई कायम राहणार?; आज निवडणूक आयोग करणार मोठी घोषणा

Corona Cases India : देशात 2 लाख 68 हजार नवे कोरोना रुग्ण, वाढत्या मृत्यूच्या संख्येनं टेन्शन वाढलं

Army Day 2022 : 15 जानेवारीला देशभरात साजरा होतो ‘सैन्य दिवस’, इतिहास आणि महत्व काय?