‘शोले’चा सर्वात मोठा सुपरहिट सीन, जो कारच्या बोनटवर बसून लिहिलेला, आजही त्याच सीनमुळे चित्रपट बघतात लोक

हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा आणि चर्चेत असणारा सीन, जो गेल्या कित्येक वर्षानंतरही चाहते प्रचंड आवडीने पाहतात. आजही सोशल मीडियावर त्या सीनचीच होते चर्चा.

शोलेचा सर्वात मोठा सुपरहिट सीन, जो कारच्या बोनटवर बसून लिहिलेला, आजही त्याच सीनमुळे चित्रपट बघतात लोक
Image Credit source: Social media
| Updated on: Jun 12, 2026 | 12:12 PM

हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वात लोकप्रिय आणि अजरामर चित्रपटांपैकी एक असलेल्या शोले या चित्रपटातील अनेक संवाद आणि सीन आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. चित्रपटातील प्रत्येक पात्र, प्रत्येक प्रसंग आणि प्रत्येक संवादाने भारतीय चित्रपटांवर अमिट छाप सोडली आहे. विशेष म्हणजे, धर्मेंद्र यांनी साकारलेला वीरू आणि त्याचा पाण्याच्या टाकीवर चढून केलेला विनोदी प्रसंग आजही प्रेक्षकांना खळखळून हसवतो.

मात्र, या गाजलेल्या सीनमागे एक अतिशय रंजक आणि कमी लोकांना माहिती असलेली कहाणी दडलेली आहे. या सीनमधील संवाद प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर यांनी अक्षरशः घाईगडबडीत, कारच्या बोनटवर उभे राहून लिहिले होते.

संवाद लिहिण्यासाठी वेळच मिळत नव्हता

एका जुन्या मुलाखतीत जावेद अख्तर यांनी या सीनच्या निर्मितीमागील आठवणी सांगितल्या होत्या. त्यांच्या मते, या सीनची संकल्पना आणि संपूर्ण रचना आधीच तयार होती. मात्र त्यातील संवाद लिहिण्याचे काम वारंवार पुढे ढकलले जात होते.

चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान विविध कामे, कलाकारांसोबतच्या चर्चा, सेटवरील गमती-जमती आणि इतर जबाबदाऱ्यांमुळे त्यांना या सीनसाठी वेळ काढता येत नव्हता. रोज संवाद लिहिण्याचा विचार केला जात होता, पण प्रत्यक्षात ते पूर्ण होत नव्हते.

एअरपोर्टला जाताना सुचली कल्पना

अखेरीस एक दिवस परिस्थिती अशी निर्माण झाली की संवाद लिहिणे टाळणे शक्य नव्हते. त्या दिवशी जावेद अख्तर यांना बेंगळुरूला जाणारी फ्लाइट पकडायची होती. ते एअरपोर्टकडे निघाले असताना त्यांनी वाटेतच हा सीन पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.

वेळेची प्रचंड कमतरता असल्याने त्यांनी कार थांबवली आणि थेट कारच्या बोनटवर कागद ठेवून संवाद लिहायला सुरुवात केली. फ्लाइटसाठी त्यांचे नाव पुकारले जात असतानाच त्यांनी घाईघाईत संपूर्ण सीनचे संवाद पूर्ण केले.

पुन्हा वाचायलाही वेळ नव्हता

जावेद अख्तर यांनी सांगितले की, त्यांच्याकडे संवाद पुन्हा वाचून त्यात सुधारणा करण्यासाठीही वेळ नव्हता. त्यांनी लिहिलेले कागद थेट आपल्या सहाय्यकाकडे दिले आणि एअरपोर्टकडे रवाना झाले.

विशेष म्हणजे, कोणतीही फेरतपासणी न करता लिहिले गेलेले हे संवाद पुढे भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय आणि चर्चित संवादांपैकी एक ठरले. आजही हा प्रसंग ‘शोले’च्या ओळखीचा अविभाज्य भाग मानला जातो.

Follow Us