
गेल्या अनेक दिवसांपासून ‘धुरंधर’ आणि त्यानंतर ‘बॉर्डर 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत ‘धुरंधर’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. मात्र, अशातच प्रदर्शित झालेला ‘मर्दानी 3’ चित्रपटाला मोठ्या चित्रपटांमुळे मोठा फटका बसल्याचं दिसून येत आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर कमी प्रतिसाद मिळत आहे. मात्र, या चित्रपटात राणी मुखर्जीने आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर संपूर्ण चित्रपट आपल्या खांद्यावर पेलला आहे. नेहमीप्रमाणेच याही वेळी तिची भूमिका प्रभावी आणि लक्षवेधी ठरतेय.
तिच्यासोबत यंदा काही नवीन आणि दमदार कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. राणी मुखर्जीशिवाय जिशु सेनगुप्ता आणि श्रुती हासन हे दोघेही प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. तर खलनायकाच्या भूमिकेत मल्लिका प्रसाद हिने साकारलेले पात्र अत्यंत भयानक असून तिच्या अभिनयामुळे प्रेक्षकांमध्ये दहशतीची भावना निर्माण होते.
‘मर्दानी 3’ची कथा यावेळीही प्रेक्षकांना अस्वस्थ करणारी आणि विचार करायला लावणारी आहे. शिवानी शिवाजी रॉय या धाडसी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणारी राणी मुखर्जी यावेळी आंतरराष्ट्रीय पातळीवरील बाल तस्करी आणि ड्रग्स माफियाच्या मोठ्या सिंडिकेटचा पर्दाफाश करताना दिसते. काही मुली अचानक बेपत्ता होण्याच्या घटनांपासून कथेला सुरुवात होते आणि हळूहळू ही चौकशी एका अत्यंत धोकादायक आणि मोठ्या गुन्हेगारी नेटवर्कपर्यंत पोहोचते. चित्रपटात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हेगार कशा प्रकारे कायद्याला चकवा देतात हेही प्रभावीपणे दाखवण्यात आले आहे.
प्रेक्षकांचा प्रतिसाद
चित्रपटाला समीक्षकांकडून तसेच प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः राणी मुखर्जीचा अभिनय आणि चित्रपटाचा स्क्रीनप्ले यांचे भरभरून कौतुक होत आहे. चित्रपटामधील थरारक वातावरण आणि वास्तववादी मांडणी प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवते. सुमारे 75 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेला हा चित्रपट ‘मर्दानी’ फ्रँचायझीतील आधीच्या भागांच्या तुलनेत अधिक भव्य असल्याचे दिसून येते.
बॉक्स ऑफिसवर ‘मर्दानी 3’ची सुरुवात अपेक्षेपेक्षा थोडी संथ राहिली आहे. ओपनिंग डे ला चित्रपटाने सुमारे 4 कोटी रुपयांची कमाई केली असून, ट्रेड एक्सपर्ट्सना किमान 7 ते 8 कोटी रुपयांची अपेक्षा होती. मोठ्या पडद्यावर ‘बॉर्डर 2’सारखा मेगा चित्रपट एकाचवेळी प्रदर्शित झाल्याचा परिणाम ‘मर्दानी 3’च्या कमाईवर झाल्याचे मानले जात आहे. मात्र, संध्याकाळच्या शोमध्ये ऑक्युपन्सी वाढताना दिसत असल्याने येत्या दिवसांत कमाईत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.