4000 कोटींच्या ‘रामायण’चित्रपटातील अभिनेत्याचा घटस्फोट, 15 वर्षानंतर पत्नीपासून झाला वेगळा

नितेश तिवारी यांच्या बहुचर्चित 'रामायण' चित्रपटातील भरतची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने लग्नाच्या 15 वर्षानंतर घेतला घटस्फोट. कोण आहे हा अभिनेता?

4000 कोटींच्या रामायणचित्रपटातील अभिनेत्याचा घटस्फोट, 15 वर्षानंतर पत्नीपासून झाला वेगळा
| Updated on: Jul 17, 2026 | 2:24 PM

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता आदिनाथ एम. कोठारे आणि अभिनेत्री उर्मिला कानेटकर कोठारे यांनी त्यांच्या 15 वर्षांच्या वैवाहिक आयुष्याला आपसी संमतीने पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला आहे. या बातमीने चाहत्यांना मोठा धक्का बसला असून, सध्या सर्वत्र या निर्णयाची चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, आदिनाथ लवकरच नितेश तिवारी यांच्या बहुचर्चित ‘रामायण’ चित्रपटात भरत ही महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार असल्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील या घडामोडींकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

आदिनाथ आणि उर्मिला यांनी गुरुवारी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक संयुक्त निवेदन प्रसिद्ध करत विभक्त होण्याचा निर्णय जाहीर केला. त्यांनी स्पष्ट केले की हा निर्णय त्यांनी बराच विचार करून, शांततेने आणि परस्पर संमतीने घेतला असून यामागे कोणताही वाद किंवा कटुता नाही.

पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, पती-पत्नी म्हणून त्यांचा प्रवास आता संपत असला तरी त्यांची मुलगी जिजाबाबतची जबाबदारी पूर्वीप्रमाणेच कायम राहणार आहे. तिच्या संगोपनासाठी ते दोघेही एकत्र काम करतील आणि तिला प्रेमळ, सुरक्षित व आधार देणारे वातावरण मिळेल याची दोघेही काळजी घेतील.

एकमेकांबद्दल कायम आदर

दोघांनी त्यांच्या निवेदनात एकमेकांविषयी असलेला आदर कायम असल्याचेही नमूद केले आहे. एकत्र घालवलेली अनेक वर्षे आणि त्या आठवणी ते नेहमी जपून ठेवतील असे त्यांनी सांगितले. तसेच त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर साथ देणाऱ्या चाहत्यांचे, मित्रपरिवाराचे आणि शुभेच्छुकांचे त्यांनी मनापासून आभार मानले.

आदिनाथ आणि उर्मिला यांनी त्यांच्या नव्या आयुष्याच्या प्रवासाला सुरुवात करत असल्याचे सांगितले. यापुढेही चाहत्यांचे प्रेम आणि आशीर्वाद मिळत राहतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. याचबरोबर माध्यमे आणि चाहत्यांना त्यांच्या खासगी आयुष्याचा आदर करण्याची विनंतीही केली. या विषयावर हेच त्यांचे पहिले आणि अंतिम अधिकृत निवेदन असून यापुढे ते कोणतीही प्रतिक्रिया देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नव्या प्रवासाला सुरुवात

आदिनाथ आणि उर्मिला यांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला असला, तरी मुलगी जिजाच्या संगोपनासाठी ते एकत्र राहून पालक म्हणून आपली जबाबदारी पार पाडणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्या या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले असून, दोघांच्या पुढील आयुष्यासाठी चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us