Video: जीव वाचवण्यासाठी झोपडीत शिरले, गर्दी वाढताच… अंगावर काटा आणणारा चेंगराचेंगरीचा व्हिडीओ
तमिळनाडूच्या करूर येथे अभिनेता विजय यांच्या रॅलीत चेंगराचेंगरी होऊन 39 लोकांचा मृत्यू झाला आणि 95 हून अधिक जण जखमी झाले. गर्दी नियंत्रणात आणण्यास अपयश आणि विजय यांचे उशिराने पोहोचणे हे चेंगराचेंगरीचे कारण सांगितले जात आहे. आता सोशल मीडियावर अंगावर काटा आणणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

तमिळनाडूच्या करूर जिल्ह्यात शनिवारी, 27 सप्टेंबर रोजी अभिनेता आणि राजकीय नेता विजय थलपती यांची रॅली होती. या रॅलीमध्ये चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीमध्ये किमान 39 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये महिला आणि मुलांचाही समावेश आहे. शिवाय 95 हून अधिक लोक जखमी झाले आणि त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, सोशल मीडियावर या चेंगराचेंगरीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये जीव वाचवण्यासाठी लोक झोपडीमध्ये शिरताना दिसत आहेत. पण गर्दी जास्त झाल्यामुळे त्यांना झोपडीचे छप्पर तोडून बाहेर निघावे लागले आहे.
डीजीपी जी. वेंकटरमन यांनी काय सांगितले?
डीजीपी (प्रभारी) जी. वेंकतरमन यांनी सांगितले की, रॅली आयोजकांनी सुमारे 10,000 लोकांसाठी मैदान मागितले होते, पण 27,000 लोक जमले. TVK च्या मागील रॅलींमध्ये गर्दी तुलनेने कमी होती, पण यावेळी प्रचंड संख्येने लोक आले. रॅलीसाठी दुपारी 3 ते रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली होती, पण सकाळी 11 वाजल्यापासूनच लोक जमा होऊ लागले होते.
वाचा: 19-20 वर्षाच्या मुलींना माझा व्हिडीओ… प्राजक्ता माळीने सांगितला धक्कादायक अनुभव
Karur, Tamil Nadu: Visuals from TVK Chief Vijay’s campaign rally where a stampede occurred, leaving several people injured pic.twitter.com/NKapbcWpZh
— IANS (@ians_india) September 27, 2025
विजय यांच्या उशिरा येण्यामुळे चेंगराचेंगरी
टीव्हीके पार्टीने घोषणा केली होती की, विजय दुपारी 12 वाजेपर्यंत रॅली स्थळी पोहोचतील. पण ते संध्याकाळी 7:40 वाजता पोहोचले. डीजीपी म्हणाले की, तोपर्यंत गर्दी तासन्तास ऊनात वाट पाहत होती आणि त्यांच्याकडे पुरेसे अन्न आणि पाणी नव्हते. लोकांचे हाल होत होते.
व्हिडीओमध्ये काय?
अपघातादरम्यान प्रचंड गर्दीत लोक बेशुद्ध होऊन पडू लागले. अनेक महिला आणि मुले जखमी झाली. चेंगराचेंगरीचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत, ज्यात लोक जीव वाचवण्यासाठी धावताना आणि झोपड्यांमध्ये शिरताना दिसत आहेत. काही व्हिडीओत महिला आणि मुले रडताना दिसत आहेत. विजय यांनी आपले भाषण मध्येच थांबवले आणि जखमी समर्थकांना पाण्याच्या बाटल्या दिल्या, तसेच पोलिसांकडे मदतीची विनंती केली.
रॅलीत 500 पोलिस तैनात होते
डीजीपी वेंकतरमन म्हणाले की, रॅलीत सुमारे 500 पोलिस तैनात होते. विजय यांनी पोलिसांच्या कामाचे कौतुक केले, पण पक्ष कार्यकर्त्यांना गर्दी व्यवस्थापनाची जबाबदारी घेण्याचा इशारा दिला. करूरसाठी एडीजीपी डेव्हिडसन ऐरवथम, 3 पोलिस महानिरीक्षक, 2 डीआयजी, 10 एसपी आणि 2000 पोलिस पाठवण्यात आले. दरम्यान, चेन्नईत विजय यांच्या घराची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. राज्य सरकारने अपघाताच्या चौकशीसाठी एकल सदस्यीय आयोग स्थापन केले आहे. मुख्यमंत्री एमके स्टालिन यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली आणि मदत व वैद्यकीय व्यवस्थेच्या देखरेखीसाठी मंत्री मा. सुब्रमणियन यांची नियुक्ती केली आहे.
विजय यांची प्रतिक्रिया
विजय यांनी सोशल मीडियावर म्हटले, “माझे हृदय तुटले आहे. मी अत्यंत वेदना आणि शोकात आहे. करूर येथे आपल्या बंधू-भगिनींना गमावलेल्या कुटुंबीयांप्रती माझी मनापासून संवेदना. रुग्णालयात उपचार घेत असलेल्यांच्या लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो.”
