खंडणी घेताना रंगेहाथ पकडलेली आरोपी ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अभिनेत्रीची सून, कोण आहे ती?

बांधकाम व्यावसायिकाकडून 10 कोटी रुपये खंडणी मागितल्याप्रकरणी एका मराठी अभिनेत्रीला पोलिसांनी अटक केली आहे. ही अभिनेत्री 'आई कुठे काय करते' मालिकेत भूमिका साकारलेल्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीची सून आहे.

खंडणी घेताना रंगेहाथ पकडलेली आरोपी आई कुठे काय करते मालिकेतील अभिनेत्रीची सून, कोण आहे ती?
अभिनेत्री हेमलता पाटकरला अटक
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 29, 2025 | 8:48 AM

गोरेगावमधल्या एका बिल्डरकडून 10 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी दोन महिलांना पोलिसांनी अटक केली. त्यापैकी एक मराठी अभिनेत्री असल्याचं समजताच मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे. हेमलता पाटकर असं त्या अभिनेत्रीचं नाव असून ती छोट्या पडद्यावरील एका लोकप्रिय अभिनेत्रीची सून आहे. कांदिवली इथली हेमलता आणि सांताक्रूझ इथली अमरिना झवेरी या दोघींनी मिळून एका प्रसिद्ध बिल्डरच्या मुलाला विनयभंगाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवू, अशी धमकी देऊन दहा कोटी रुपयांची खंडणी मागितली. याच खंडणीचा पहिला हप्ता दीड कोटी रुपये स्वीकारताना दोघींना मुंबई गुन्हे शाखेनं रंगेहाथ पकडलं.

कोण आहे हेमलता पाटकर?

हेमलता पाटकर ही ‘आई कुठे काय करते’ या गाजलेल्या स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकेत कांचन देशमुखची भूमिका साकारलेल्या अभिनेत्री अर्चना पाटकर यांची सून आहे. आरोपी हेमलता आणि अमरिना यांना 29 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अटकेनंतर त्यांना आधी पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. या कोठडीची मुदत संपल्यानंतर दोघींना शनिवारी एस्प्लेनेड न्यायालयात हजर केलं असताना न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

नेमकं प्रकरण काय?

नोव्हेंबरमध्ये अंधेरी पश्चिम इथल्या एका हॉटेलमध्ये एका बिल्डरच्या मुलाच्या साखरपुड्याच्या पार्टीत लेझर लाइट्सच्या वापरावरून हा वादा सुरू झाला होता. लेझर लाइट्सवरून हेमलता, अमरिना यांनी बिल्डरच्या मुलाशी वाद घातला होता. हा वाद नंतर इतका वाढला की त्याचं हाणामारीत रुपांतर झालं. या वादानंतर 23 नोव्हेंबरला महिलांनी पोलीस ठाण्यात बिल्डरच्या मुलाविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. ही तक्रार मागे घेण्यासाठी आधी त्यांनी बिल्डरकडे 10 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. अखेर दोन्ही पक्षांमध्ये तडजोडीनंतर ही रक्कम 5.5 कोटी रुपयांवर निश्चित करण्यात आली.

खंडणी आणि महिलांच्या सततच्या दबावाला वैतागून अखेर बिल्डरने मुंबई गुन्हे शाखेकडे धाव घेतली. तेव्हा पोलिसांनी सापळा रचत हेमलता आणि अमरिना यांना खंडणीचा पहिला हप्ता स्वीकारताना रंगेहाथ पकडलं.

पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं की, हेमलता पाटकरच्या विरोधात मेघवाडी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 452, 323 आणि 504 अंतर्गत यापूर्वीच एक फौजदारी गुन्हा दाखल आहे. त्यांनी यापूर्वी असे किती गुन्हे केले आहेत, याची पडताळणी करणं आवश्यक असल्याचं अधिकाऱ्यांनी न्यायाधीशांना सांगितलं. त्यामुळे आरोपींची पोलीस कोठडी वाढवण्यात आली.