संजय दत्तच्या ‘भारतात शांतता नाही’ वक्तव्यावर आमिर खान म्हणाला ‘अरे बापरे!’; व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले
सध्या आमिर खानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. भारतात शांतता नाही, या संजय दत्तच्या वक्तव्यावर त्याची प्रतिक्रिया विचारण्यात आली होती.

अभिनेता संजय दत्तच्या ‘भारतामध्ये आता शांतता राहिलेली नाही’ या वक्तव्यावरून सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. या वक्तव्यावरून संजय दत्तला टीकेलाही सामोरं जावं लागलं होतं. दरम्यान, मुंबईत आयोजित ‘सेलिब्रेट सिनेमा फेस्टिव्हल 2026’मध्ये सहभागी झालेल्या आमिर खानला याच मुद्द्यावर प्रश्न विचारण्यात आला. मात्र, आमिर खानने या प्रश्नावर कोणतंही भाष्य करणं टाळलं. त्याची ही प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 7 ऑक्टोबर रोजी मुंबईतील व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनलमध्ये ‘सेलिब्रेट सिनेमा फेस्टिव्हल 2026’चं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी आमिर खान सहभागी झाला होता. यावेळी त्याने ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटाबद्दल तसंच त्याच्या सिनेसृष्टीतील प्रवासाबद्दल संवाद साधला. याच कार्यक्रमादरम्यान एका पत्रकाराने आमिरला संजय दत्तच्या अलीकडील वक्तव्याबद्दल प्रश्न विचारला.
पत्रकाराने संजय दत्तच्या ‘भारतामध्ये आता शांतता जाणवत नाही’ या विधानावर आमिर खानचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रश्न ऐकताच आमिरने थेट उत्तर देण्याऐवजी “अरे बाप रे!” अशी प्रतिक्रिया दिली आणि हसत हा प्रश्न टाळला. त्याने या मुद्द्यावर आपलं मत मांडण्यास नकार दिला. आमिरचा हा अंदाज कॅमेऱ्यात कैद झाला आणि त्यानंतर त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला.
पहा व्हिडीओ-
View this post on Instagram
शेखर सुमन यांच्या ‘शेखर टुनाइट’ या शोमध्ये संजय दत्त सहभागी झाला होता. यावेळी त्याने भारतातील परिस्थितीबाबत बोलताना देशात पूर्वीसारखी शांतता जाणवत नसल्याचं म्हटलं होतं. त्याचवेळी त्यांने भारतीय लोक प्रेमळ आणि मनमिळाऊ असल्याचं सांगत देशात पुन्हा शांततेचे दिवस यावेत, अशी प्रार्थना केल्याचंही म्हटलं होतं. मात्र त्याच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटू लागल्यानंतर संजय दत्तने स्पष्टीकरण दिलं. हे वक्तव्य स्क्रिप्टेड आणि व्यंगात्मक संवादाचा भाग होतं, असं त्यांनी स्पष्ट केलं. ‘मुन्ना भाई’च्या शैलीतील विनोद, व्यंग आणि ‘गांधीगिरी’च्या माध्यमातून प्रेम, एकता आणि सद्भावनेचा संदेश देण्याचा उद्देश असल्याचं त्याने सांगितलं. त्याच्या वक्तव्याचा संदर्भापासून वेगळा अर्थ काढला गेल्याची खंतही त्याने व्यक्त केली.
यानंतर संजय दत्तने पुन्हा एकदा स्पष्टीकरण देत हे त्याचं वैयक्तिक मत नसल्याचं सांगितलं. त्यामुळे प्रकरण काहीसं शांत होत असतानाच आमिर खानला याच मुद्द्यावर प्रश्न विचारण्यात आला. आमिरने मात्र उत्तर न देण्याचा निर्णय घेतल्याने त्याची प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरली आहे.
