गौरीसोबतचं अफेअर मीडियापासून कसं लपवलं? खुद्द आमिर खाननेच केला खुलासा
अभिनेता आमिर खान गेल्या 18 महिन्यांपासून गौरी स्प्रॅट नावाच्या महिलेला डेट करतोय आणि याची कोणाला कानोकान खबर लागली आहे. स्वत:च्या साठाव्या वाढदिवशी त्याने त्याच्या रिलेशनशिपचा खुलासा माध्यमांसमोर केला.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खान सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. आमिरने स्वत:च्या 60 व्या वाढदिवशी त्याच्या डेटिंग लाइफविषयी मोठा खुलासा केला. गौरी स्प्रॅट नावाच्या एका मैत्रिणीला डेट करत असल्याचं त्याने पापाराझींसमोर जाहीर केलं. इतकंच नव्हे तर त्याने गौरीची ओळखसुद्धा पापाराझींना करून दिली. दोन घटस्फोटानंतर वयाच्या साठाव्या वर्षी आमिरच्या रिलेशनशिपच्या बातमीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. विशेष म्हणजे आमिर आणि गौरी हे दोघं गेल्या 25 वर्षांपासून एकमेकांना ओळखतात आणि गेल्या दीड वर्षापासून ते एकमेकांना डेट करतायत. सोशल मीडिया आणि पापाराझींचं एवढं कल्चर असतानाही आमिरने याबद्दल कोणाला कानोकान खबर लागू दिली नाही. आपलं रिलेशनशिप माध्यमांपासून कसं लपवलं, याबद्दलही आमिरने सांगितलं आहे.
आमिरने त्याच्या रिलेशनशिपला इतके महिने सर्वांपासून कसं लपवलं, हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता आहे. याबद्दल मीडियासोबत बोलताना आमिरने सांगितलं, “पाहिलंत.. मी तुम्हाला काहीच समजू दिलं नाही. ती बेंगळुरूमध्ये राहते. तिला भेटायला मी तिथे जायचो. तिथे जास्त मीडिया नसायची. त्यामुळे आमचं रिलेशनशिप सर्वांपासून लपून राहिलं. जेव्हा गौरी मुंबईत मला आणि माझ्या कुटुंबीयांना भेटायला आली, तेव्हा मीडियाने तिच्याकडे एवढं लक्ष दिलं नाही.” यावेळी सलमान खान आणि शाहरुख खानकडे लक्ष वेधत आमिर मस्करीत म्हणतो, “त्यांच्यामुळे माझ्या घरावर मीडियाचा थोडा फोकस कमी आहे. त्यामुळेच तुम्हाला माझ्या रिलेशनशिपबद्दल समजलं नाही.”
“आम्ही दोघं आता कमिटेड आहोत. माझ्याकडे आता लपवण्यासारखं काहीच नाही. जर मी गौरीसोबत कॉफी डेटवर गेलो तर तुम्हीसुद्धा आमच्यासोबत येऊ शकाल”, असं आमिर पापाराझींना म्हणाला. यावेळी त्याला गौरीसोबत तिसऱ्या लग्नाबद्दलही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तो हसत म्हणाला, “मी दोनदा लग्न केलंय. आता वयाच्या 60 व्या वर्षी तिसरं लग्न करणं कदाचित मला शोभणार नाही. परंतु बघू पुढे काय होतंय?”
आमिरने रिना दत्ताशी पहिलं लग्न केलं होतं. या दोघांना आयरा आणि जुनैद ही दोन मुलं आहेत. रिनाला घटस्फोट दिल्यानंतर आमिरने किरण रावशी दुसरं लग्न केलं. किरण आणि आमिरला आझाद हा मुलगा आहे. लग्नाच्या 16 वर्षांनंतर किरण आणि आमिरने 2021 मध्ये घटस्फोट घेतला.