आराध्या बच्चन प्रकरणात HC चे मोठे सवाल; बच्चन कुटुंबाच्या प्रतिष्ठेवर चर्चा
‘बच्चन’ नावाची प्रतिष्ठा किती पिढ्यांपर्यंत? आराध्या बच्चन प्रकरणात दिल्ली हायकोर्टाचे महत्त्वाचे सवाल. नेमकं प्रकरण काय?

अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन हिच्याशी संबंधित प्रकरणात दिल्ली हायकोर्टाने गुरुवारी 13 ऑगस्ट 2026 रोजी काही महत्त्वाचे कायदेशीर प्रश्न उपस्थित केले. एखाद्या प्रसिद्ध कुटुंबाच्या नावामुळे निर्माण झालेली प्रतिष्ठा पुढील किती पिढ्यांपर्यंत लागू राहू शकते, तसेच इंटरनेटवर पसरवण्यात येणाऱ्या खोट्या बातम्या बौद्धिक संपदा अधिकारांचे उल्लंघन ठरू शकतात का, यावर न्यायालयाने विचार केला आहे.
आराध्या बच्चन आणि तिचे वडील अभिषेक बच्चन यांनी 2023 मध्ये दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती. यामध्ये काही यूट्यूब चॅनेल्स आणि अज्ञात व्यक्तींवर आराध्याच्या आरोग्याबाबत तसेच तिच्या खासगी आयुष्याबाबत दिशाभूल करणारी आणि खोटी माहिती प्रसारित केल्याचा आरोप करण्यात आला होता. काही व्हिडीओंमध्ये तिची प्रकृती गंभीर असल्याचे, ती रुग्णालयात असल्याचे, तर एका व्हिडीओमध्ये तिच्या मृत्यूबाबतही खोटा दावा करण्यात आल्याचे न्यायालयीन नोंदीत नमूद आहे.
‘बच्चन’ नावाच्या प्रतिष्ठेचा मुद्दा
या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती अनूप जयराम भंभानी यांच्या खंडपीठासमोर बच्चन कुटुंबाच्या वतीने ज्येष्ठ वकील प्रवीण आनंद यांनी बाजू मांडली. त्यांनी केवळ आराध्याच नाही तर संपूर्ण बच्चन कुटुंबाच्या नावाचा आणि प्रतिष्ठेचा प्रश्न असल्याचे सांगितले.
यावर न्यायालयाने महत्त्वाचा सवाल उपस्थित केला. एखाद्या प्रसिद्ध कुटुंबाच्या नावाची प्रतिष्ठा ही ट्रेडमार्कशी संबंधित ‘गुडविल’प्रमाणे मानली तर ती प्रतिष्ठा पुढील किती पिढ्यांपर्यंत टिकू शकते? तसेच एखाद्या आडनावाला कुटुंबाच्या कर्तृत्वामुळे आणि प्रसिद्धीमुळे मिळालेली प्रतिष्ठा पिढ्यान्पिढ्या पुढे जाते का, आणि गेल्यास त्याची कायदेशीर मर्यादा काय असावी असा प्रश्न कोर्टाने उपस्थित केला.
फेक न्यूज म्हणजे बौद्धिक संपदा अधिकारांचे उल्लंघन?
या सुनावणीत न्यायालयाने आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. इंटरनेटवर एखाद्या व्यक्तीबद्दल अत्यंत आक्षेपार्ह किंवा नुकसानकारक खोटी माहिती पसरवली गेल्यास ते बौद्धिक संपदा अर्थात ‘इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी’ अधिकारांचे उल्लंघन मानता येईल का? आणि तसे असल्यास कोणत्या प्रकारच्या आयपी अधिकारांचे उल्लंघन ठरेल याचाही विचार कोर्ट करणार आहे.
कोर्टासमोर तीन प्रमुख कायदेशीर प्रश्न
कुटुंबाच्या नावाची प्रतिष्ठा ट्रेडमार्क किंवा ‘गुडविल’प्रमाणे मानली गेल्यास ती किती पिढ्यांपर्यंत कायम राहू शकते?
इंटरनेटवर पसरवली जाणारी खोटी आणि नुकसानकारक माहिती बौद्धिक संपदा अधिकारांचे उल्लंघन ठरू शकते का? ठरल्यास कोणत्या अधिकाराचे?
मानहानी किंवा प्रतिष्ठेला धक्का पोहोचवण्याची संकल्पना बौद्धिक संपदा अधिकारांशी जोडता येऊ शकते का?
या प्रकरणाची पुढील सुनावणी 15 सप्टेंबर रोजी दिल्ली उच्च न्यायालयात होणार आहे. दरम्यान, न्यूयॉर्कमधील सुट्टीवरून परतल्यानंतर आराध्या नुकतीच तिचे आई-वडील अभिषेक आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्यासोबत दिसली.