‘राजा शिवाजी’साठी अभिषेक बच्चनने का घेतलं नाही मानधन? उत्तराने ट्रोलर्सची केली बोलती बंद

अभिषेक बच्चनने रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' या चित्रपटात भूमिका साकारण्यासाठी कोणतंही मानधन घेतलं नाही. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुद्द अभिषेकने त्यामागचं कारण सांगितलं आहे.

राजा शिवाजीसाठी अभिषेक बच्चनने का घेतलं नाही मानधन? उत्तराने ट्रोलर्सची केली बोलती बंद
रितेश देशमुख, अभिषेक बच्चन
Image Credit source: Instagram
| Updated on: May 12, 2026 | 9:59 AM

रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करतोय. या चित्रपटात कलाकारांची मोठी फौज पहायला मिळतेय. परंतु त्यातील काही कलाकारांनी या ऐतिहासिक कथानक असलेल्या चित्रपटात भूमिका साकारण्यासाठी अजिबात मानधन स्वीकारलेलं नाही. खुद्द रितेशनेही याचा खुलासा केला होता. यामध्ये सलमान खान, विद्या बालन, अभिषेक बच्चन यांसारख्या कलाकारांचा समावेश आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिषेकने मानधन न घेण्यामागचं कारण सांगितलं आहे.

‘न्यूज 18’ला दिलेल्या मुलाखतीत अभिषेक म्हणाला, “आजकाल रील्समध्ये लोक फॅक्ट्स (तथ्ये) आणि फिगर्स (आकडेवारी) यांबद्दल बोलतात. मीडियालाही अभिनेता-अभिनेत्रींची फी, व्हॅनची मागणी यांसारख्या बातम्या सांगताना फार मजा येते. परंतु अखेर ही एक कला आहे, जे मनापासून सुरू होतं. जेव्हा आम्ही एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवतो, तेव्हा मानधन कमी करण्यात किंवा न घेण्यात आम्हाला काहीच समस्या नसते. हे ट्रांजेक्शन नाही, तर भावनिक ट्रांजेक्शन आहे.”

यावेळी रितेश आणि जिनिलिया यांचं कौतुक करत तो पुढे म्हणाला, “आजकाल चित्रपटांमध्ये फार गणित लावलं जातं. परंतु रितेश आणि जिनिलिया यांनी हे सिद्ध केलं की प्रत्येक गोष्ट आकड्यांवर आधारित नसते. हा चित्रपट त्यांच्यासाठी खूप पवित्र होता. राजा शिवाजी या चित्रपटाकडे त्यांनी कधीच एक प्रोजेक्ट म्हणून पाहिलं नाही, तर त्याहून अधिक महत्त्वाचं आणि पवित्र मानून काम केलं. मराठी चित्रपटसृष्टीत याआधी कधीच इतक्या भव्यतेचा चित्रपट बनला नव्हता. संपूर्ण युनिटला खुश, सुरक्षित आणि उत्साही ठेवणं अत्यंत कठीण काम होतं. पण रितेश आणि जिनिलियाने ही जबाबदारी उत्तमपणे स्वीकारली. मला सेटवर कोणाचीच तक्रार ऐकू आली नाही.”

‘राजा शिवाजी’ या चित्रपटासाठी अभिषेकने स्क्रिप्ट न वाचताच होकार दिला होता. “मी रितेश आणि जिनिलिया यांना माझ्या कुटुंबाचाच एक भाग मानतो. दोघंही अत्यंत प्रेमळ, विनम्र आणि विश्वासू आहेत. हा माझा पहिलाच मराठी चित्रपट आहे. मुंबईत लहानाचा मोठा झाल्याने मी मराठी भाषेशी परिचित होतोच, पण स्क्रीनवर पहिल्यांदाच मराठी बोलताना थोडं दडपण होतं. परंतु रितेशच्या मार्गदर्शनाखाली सर्वकाही व्यवस्थित पार पडलं”, अशा शब्दांत अभिषेकने त्याचा अनुभव सांगितला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us