
KRK Firing Case : मुंबईतील झालेल्या गोळीबार घटनेप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी अभिनेता आणि स्वयंघोषित चित्रपट समीक्षक कमाल रशीद खान उर्फ केआरके ( Kammal R khan) याला शुक्रवारी रात्री उशिरा ताब्यात घेतलं. ओशिवरा येथील एका निवासी इमारतीवर गोळीबार केलेली बंदूक कमाल आर. खान याच्या मालकीच्या परवानाधारक बंदुकीतून असल्याची माहिती आहे. तो या प्रकरणातील मुख्य संशयित आहे. शुक्रवारी संध्याकाळी उशिरा केआरकेला ओशिवरा पोलिस ठाण्यात आणण्यात आले. आपल्या जबाबात केआरकेने गोळीबार केल्याची कबुली दिली आणि त्याने परवानाधारक बंदूक वापरल्याचे सांगितले. मात्र आपला कोणालाही इजा करण्याचा हेतु नव्हता असही त्याने सांगितलं, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी केआरकेची बंदूक केली जप्त
केआरके याची बंदूक जप्त करण्यात आली आहे आणि पुढील कारवाईसाठी कागदपत्रांची पूर्तता सुरू आहे असंही पोलिसांनी नमूद केलं. रिपोर्ट्सनुसार, ही घटना 18 जानेवारी रोजी घडली, ज्यामध्ये अंधेरीतील ओशिवरा येथील एका निवासी इमारतीवर दोन गोळ्या झाडण्यात आल्या. नालंदा सोसायटीमधून दुसऱ्या मजल्यावरून आणि दुसरी चौथ्या मजल्यावरून अशा दोन गोळ्या सापडल्या. एक फ्लॅट लेखक-दिग्दर्शकाचा आहे आणि दुसरा मॉडेलचा आहे.
लेखक-दिग्दर्शकाच्या आणि मॉडेलच्या घरावर झाडण्यात आल्या गोळ्या
मुंबईतील ओशिवरा परिसरात एका लेखक-दिग्दर्शक आणि एका स्ट्रगलिंग मॉडेलच्या घरावर झालेल्या गोळीबारामुळे सर्वत्र घबराट पसरली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नालंदा सोसायटीच्या दुसऱ्या मजल्यावर राहणारे नीरज कुमार मिश्रा (45) हे व्यवसायाने लेखक आणि दिग्दर्शक आहेत, तर चौथ्या मजल्यावर राहणारे प्रतीक बैद (29) हा स्ट्रगलिंग मॉडेल असल्याचं समजतं. गोळीबारानंतर दुसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये गोळ्यांचे निशाण आढळून आले.
घटनेची माहिती मिळताच, संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील ओशिवरा पोलिस ठाण्यातील 18 पोलिसांचे पथक, गुन्हे शाखेच्या अनेक पथकांसह या प्रकरणाचा तपास करत होते. मात्र सुरुवातीला, सीसीटीव्ही फुटेज नसल्यामुळे पोलिसांना कोणतेही पुरावे सापडले नाहीत. मात्र या गोळ्या कमाल आर. खान याच्या बंदुकीतून झाडल्या गेल्या असण्याची शक्यता आहे अशी पुष्टी पोलिसांनी फॉरेन्सिक टीमच्या मदतीने केली. याप्रकरणी कागदपत्रांची प्रक्रिया सुरू आहे आणि सकाळपर्यंत अभिनेत्याला औपचारिक अटक होऊ शकते असेही पोलिसांनी नमूद केलं.