सुपरस्टारच्या मुलाने क्रॅक केली UPSC परीक्षा; उत्तम रँकिंगसह बनला IAS अधिकारी
या स्टारकिडने त्याच्या वडिलांच्या पावलांवर पाऊल न टाकता स्वत:साठी एक वेगळा मार्ग निवडला आणि कठोर मेहनतीच्या जोरावर यश संपादन केलं. आज हा स्टारकिड आयएएस अधिकारी म्हणून काम करतोय. त्याचे वडील दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आहेत.

चित्रपटसृष्टीत स्टारकिड्सना प्रसिद्धी मिळण्याची गोष्ट काही नवीन नाही. अभिनयविश्वात काम करणाऱ्या अनेक कलाकारांची मुलं त्यांच्या आईवडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत कलाकार बनतात. कोणी अभिनेता, कोणी दिग्दर्शक, कोणी निर्माता तर कोणी पटकथालेखक बनतो. परंतु असेही काही स्टारकिड्स आहेत, जे त्यांच्या आईवडिलांच्या प्रोफेशनपेक्षा काहीतरी वेगळा मार्ग निवडतात आणि त्यात चमकदार कामगिरी करून दाखवतात. असाच एक स्टारकिड सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या स्टारकिडने रील नाही तर रिअल लाइफ हिरो बनणं पसंत केलंय. ही कहाणी आहे आयएएस अधिकारी श्रुतंजय नारायणनची. प्रसिद्ध तमिळ कॉमेडियन चिन्नी जयंत ऊर्फ कृष्णमूर्ती नारायणन यांचा हा मुलगा आहे.
चिन्नी जयंत हे तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध आणि लोकप्रिय नाव आहे. 80 च्या दशकात त्यांनी रजनीकांत यांच्या अनेक चित्रपटांमध्ये विनोदी भूमिका साकारून प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे. त्यांच्या विनोदाच्या टायमिंगचं आजही कौतुक केलं जातं. त्यांचा अभिनय इतका दमदार होता की प्रेक्षकांना त्यांच्याशिवाय चित्रपट अपूर्णच वाटायचा. परंतु चिन्नी जयंत यांचा मुलगा श्रुतंजयने वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत अभिनेता होण्याचा मार्ग निवडला नाही. लाइमलाइटपासून दूर जात त्याने अभ्यासाला अधिक महत्त्व दिलं. कठोर मेहनतीच्या जोरावर त्याने एका वेगळ्या क्षेत्रात मोठं यश संपादन केलं आहे.
श्रुतंजयने चेन्नईमधल्या गिंडी कॉलेज ऑफ इंजीनिअरिंगमधून ग्रॅज्युएशन केलं आणि त्यानंतर अशोक युनिव्हर्सिटीमधून मास्टरची पदवी संपादित केली. त्यानंतर तत्याने एका स्टार्टअपमध्ये काम केलं. परंतु त्याच्या मनात आयएएस अधिकारी बनण्याचं स्वप्न होतं. नोकरी करता करता त्याने दररोज 4 ते 5 तास अभ्यास केला. अभ्यास आणि स्वत:चा खर्च भागवण्यासाठी त्याने रात्रपाळीतही काम केलं. वडिलांच्या ओळखीवर अवलंबून राहण्यापेक्षा त्याने मेहनतीच्या जोरावर आपला वेगळा मार्ग तयार केला. याच मेहनतीचं फळ त्याला मिळालं आहे.
View this post on Instagram
श्रुतंजयने युपीएससी सिव्हिल सेवा परीक्षेत ऑल इंडिया रँक 75 प्राप्त केलं आहे. दुसऱ्याच प्रयत्नात त्याला हे यश मिळालं आहे. त्याने समाजशास्त्र हा विषय पर्यायी विषय म्हणून निवडला आणि भूगोलातही विशेष रुची दाखवली. आता श्रुतंजय नारायणन तमिळनाडूतील तिरुप्पुर जिल्ह्यात उपजिल्हाधिकारी म्हणून काम करत आहे. याआधी त्याने विल्लुप्पुरम इथं अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून काम केलं होतं. याठिकाणी त्याने तळागाळात अनेक विकासकामं राबवली होती.
