पैशापुढं सरकारपासून न्यायव्यवस्थेपर्यंत सगळे झुकले; महादेवी हत्तीणीला ‘वनतारा’त पाठवल्यावर किरण मानेचा मोठा गौप्यस्फोट
याआधी गुजरातमध्ये एकही हत्ती नव्हता. पण येत्या काळात... महादेवी हत्तीणीला ‘वनतारा’त पाठवल्यावर अभिनेता किरण मानेचा मोठा गौप्यस्फोट. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे.

कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील नांदणी मठातील ‘माधुरी’ ऊर्फ ‘महादेवी’ हत्तीण सध्या चांगलीच चर्चेत आहे. या हत्तीणीला नुकतीच गुजरातमधील ‘वनतारा’ प्राणीसंग्रहालयात पाठवण्यात आली. या निर्णयाला स्थानिकांचा तीव्र विरोध होता, परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे नांदणीकरांना नाईलाजाने त्यांच्या लाडक्या हत्तीणीला निरोप द्यावा लागला. या घटनेमुळे नांदणी आणि कोल्हापूर परिसरात तीव्र नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर, अभिनेते आणि ठाकरे गटाचे नेते किरण माने यांनी सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे आपला संताप व्यक्त केला आहे.
काय आहे किरण मानेची पोस्ट?
एका मुक्या जीवाच्या भावनेशी लै जिवघेणा खेळ खेळला गेलाय. ‘वनतारा’ वाल्यांना एक प्रशिक्षित हत्ती हवा होता. संपूर्ण भारतात शोध घेतल्यावर त्यासाठी त्यांना दोन हत्तीणी पसंत पडल्या. त्यातली एक केरळची होती. केरळवाल्यांनी ती द्यायला साफ नकार दिला. मग हे ‘व्यापारी’ नांदणीत आले. तिथल्या महादेवी उर्फ माधुरीसाठी त्यांनी ‘सौदा’ करायचा प्रयत्न केला. “आम्हाला ही प्रशिक्षित हत्तीण हवी आहे” म्हणत पैशांचं आमिषही दाखवलं. पण अख्ख्या नांदणीचा जीव असलेली माधुरी ते कशी विकतील?
वाचा: महादेवी हत्तीण पुन्हा कोल्हापूरच्या नांदणी मठात परतणार? काय आहे प्रकरण?
…मग या स्टोरीत ‘ड्रामा’ आला. ‘पेटा’ नांवाच्या कॅरॅक्टरची एंट्री झाली. पेटाचे डॉक्टर्स अचानक माधुरीला तपासायला आले आणि त्यांनी सांगितलं की ‘माधुरीच्या पायाला इजा आहे. इथे तिच्या तब्येतीची हेळसांड केली जाते. तिचा जीव धोक्यात आहे.’ मग नांदणीवाल्यांनी त्यांचा डॉक्टर आणला. त्या डॉक्टरांनी सांगितलं माधुरी एकदम ठणठणीत आहे. पेटावाले सांगताहेत तसं काहीही नाहीये. पण पैशापुढं सरकारपासून न्यायव्यवस्थेपर्यंत सगळे झुकले.
…महादेवी उर्फ माधुरीला नांदणी सोडून जावं लागलं. नांदणीवर तिचा आणि तिच्यावर नांदणीचा लै जीव होता. इथल्या प्रत्येक घरावर तिची मायेची सावली होती. माहेरी आलेली पोर पहिल्यांदा महादेवीला भेटायची, मग आईबापाला. गांव सोडताना या मुक्या प्राण्याची वेदना डोळ्यांतून घळाघळा वहात होती, ते पाहून काळीज पिळवटलं !
यापूर्वी अशाच पद्धतीनं दोन वर्षांपूर्वी ताडोबा अभयारण्यातनं तब्बल १३ हत्ती महाराष्ट्र सरकारनं रिलायन्सला दिलेले आहेत. कारणं तीच : हत्तींची काळजी घ्यायला कुशल स्टाफ नाही.’
तुमच्या माहितीसाठी सांगतो माझ्या भावाबहिणींनो, आजवर गुजरात मध्ये एकही हत्ती नव्हता. पण येत्या काही काळात तुम्हाला हत्ती पाहायचा असेल तर गुजरातला जावं लागेल. कारण या लोकांचा देशातल्या अनेक हत्तींवर डोळा आहे… आणि हाताशी ‘पेटा’ नावाचा हुकमी पत्ता आहे !
बाय द वे, आता महादेवीनंतर तीन मठांच्या हत्तींवर संक्रांत आहे. कर्नाटकातल्या शेडबाळ, अकलनूर आणि बिचले इथल्या मठांना त्यांच्या हत्तींच्या आरोग्याची हेळसांड होत असल्याची नोटिस गेली आहे… असो.
धुआँ जो कुछ घरों से उठ रहा है… न पूरे शहर पर छाए, तो कहना !
प्रकरण नेमके काय?
‘पेटा’ या प्राणी हक्क संघटनेने नांदणी मठातील महादेवी हत्तीणीचा वन विभागाच्या परवानगीशिवाय मिरवणुकीसाठी वापर केल्याचा आरोप केला होता. यानंतर प्रकरण न्यायालयात गेले आणि चौकशीसाठी समिती नेमण्यात आली. समितीने हत्तीणीची पाहणी करून अहवाल सादर केला, ज्यात प्राण्यांच्या हक्कांना प्राधान्य देण्याचे नमूद करण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाने महादेवीला गुजरातमधील वनतारा येथे पाठवण्याचा आदेश दिला. नांदणी मठाने याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली, परंतु ती फेटाळण्यात आली. त्यामुळे महादेवी हत्तीण गुजरातमधील वनतारा येथे पाठवण्यात आली.
