ट्रेनमध्ये मॉडेलने RPF जवानासोबत घातला राडा, नेमकं काय घडलं?

एका मॉडेलने अरावली एक्सप्रेसमध्ये शिवीगाळ आणि कपडे काढले अन् राडा केल्याची बातमी समोर आली आहे. नेमकं काय घडलं?

ट्रेनमध्ये मॉडेलने RPF जवानासोबत घातला राडा, नेमकं काय घडलं?
Image Credit source: Social media
| Updated on: Aug 16, 2026 | 7:35 PM

एका मॉडेलला रेल्वेतील गोंधळाच्या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या मॉडेलला 12 ऑगस्ट रोजी अरावली एक्स्प्रेसच्या एसी कोचमध्ये आरपीएफ जवानांसोबत वाद घालत मोठा गोंधळ घातल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे ट्रेनमध्ये तब्बल तासभर गोंधळाचं वातावरण निर्माण झाल्याचं वृत्त आहे.

‘फ्री प्रेस जर्नल’च्या वृत्तानुसार, अंतरा शूटिंगच्या कामासाठी सुरतकडे जात होती. तिच्याकडे स्लीपर क्लासचं तिकीट होतं, मात्र ती आरक्षित एसी कोचमध्ये गेल्याचा आरोप आहे. ज्या प्रवाशाची त्या सीटवर आरक्षणाची जागा होती, त्याने याबाबत टीटीकडे तक्रार केली. त्यानंतर अंतरा यांना जागा रिकामी करण्यास सांगण्यात आलं आणि वादाला सुरुवात झाली.

आरपीएफ जवानांशी वाद

बोरीवली आणि दहानू दरम्यान रात्री साडेनऊ ते रात्री 10.50 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे. प्रवाशाने टीटीला बोलावून घेतल्यानंतर तिकीट कलेक्टर हरिकेश त्रिपाठी यांनी आरपीएफला माहिती दिली. त्यानंतर आरपीएफचे सहाय्यक उपनिरीक्षक यामिनीकांत मिश्रा आणि कॉन्स्टेबल राजेश कुमार यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.

मात्र, यावेळी अंतरा यांनी आरपीएफ जवानांसोबत शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. वाद वाढल्यानंतर त्या हिंसक झाल्या आणि त्यांनी कपडे काढल्याचंही पोलिसांच्या तक्रारीत नमूद असल्याचं वृत्त आहे. एवढंच नाही तर त्यांनी रेझरची ब्लेड हातात घेऊन अधिकाऱ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या झटापटीत मॉडेलला देखील दुखापत झाल्याची माहिती आहे.

एसी कोचची काच फोडून पळण्याचा प्रयत्न?

गोंधळादरम्यान अंतरा यांनी ट्रेनच्या एसी कोचची काच फोडून पळून जाण्याचाही प्रयत्न केल्याचं वृत्त आहे. अखेर आरपीएफ जवानांनी त्यांना दहानू रेल्वे स्थानकात ट्रेनमधून उतरवलं आणि पुढील कारवाईसाठी सरकारी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिलं.

या संपूर्ण प्रकारात पोलिसांच्या गणवेशाचं आणि मोबाईल फोनचं नुकसान झाल्याचंही सांगितलं जात आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी बोरीवली रेल्वे पोलिसांनी मॉडेलला ताब्यात घेतलं.

स्वतःच्या अटकेची केली मागणी

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलिसांनी मॉडेलच्या  कुटुंबीयांशी संपर्क साधण्याची आणि कायदेशीर सल्ला घेण्याची संधी दिली होती. मात्र, त्यांनी त्यास नकार देत स्वतःला अटक करण्याची मागणी केल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंदवून मॉडेल विरोधात नोटीस बजावली आहे.

अंतरा बॅनर्जी यांचा खुलासा, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेली महिला या अभिनेत्री अंतरा बॅनर्जी असल्याचा दावा सोशल मीडिया तसेच माध्यमांमध्ये केला जात होता. याबाबत खुद्द अंतरा बॅनर्जी यांनीच खुलासा केला आहे. या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही. पोलिसांनी ताब्यात घेतलेली महिला ही वेगळी आहे. नावात साधर्म्य असल्याने तसा दावा केला जातोय, असं अंतरा बॅनर्जी यांनी सांगितले. तसेच या प्रकरणात माझा काहीही संबंध नसून याची सर्वांनी दखल घेऊन अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us