
Parvathy Thiruvothu : साऊथ इंडस्ट्रीमधील लोकप्रिय आणि अभिनयासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री पार्वती थिरुवोथु हिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या बालपणी घडलेल्या अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायक अनुभवाबद्दल मोकळ्यापणाने भाष्य केले आहे. हा अनुभव इतका धक्कादायक होता की, अशी कोणतीही आठवण कोणत्याही मुलाच्या वाट्याला येऊ नये असे पार्वतीला वाटते.
‘द मेल फेमिनिस्ट’ या पॉडकास्टमध्ये बोलताना पार्वतीने सांगितले की, अगदी लहान वयातच तिच्यासोबत छेडछाड आणि लैंगिक शोषणासारख्या घटना घडू लागल्या. अनेक वेळा अनोळखी लोकांकडून तिचा छळ करण्यात आला. कुणी तिच्या छातीवर जोरात मारले तर कुणी चिमटा काढला. या घटना केवळ मानसिक धक्का देणाऱ्या नव्हत्या तर शारीरिक वेदनाही देणाऱ्या होत्या.
शोषण आणि छेडछाड
एका अत्यंत धक्कादायक घटनेचा उल्लेख करताना पार्वती म्हणाली की, त्या घटनेने तिला आयुष्यभरासाठी घाबरवून टाकले. त्या आठवणी अनेक वर्षे तिच्या मनात भीतीच्या सावलीसारख्या राहिल्या. ती म्हणाली की, ‘अनेक वेळा असं झालं आहे. एका वेळी तर इतका जोरात मार बसला की मी वेदनेने कळवळले होते.’
‘आपण जन्माला येतो आणि त्यानंतर आपलं शोषण सुरू होतं. ऑटोरिक्षात चढताना कुणीतरी चिमटा काढतो. रेल्वे स्टेशनवर आईला सोडून बाबांसोबत चालत असताना कुणीतरी छातीवर जोरात मारून निघून जातो. तो स्पर्श नव्हता थेट मार होता. मी त्या वेळी खूप लहान होते आणि मला आठवतंय मला खूप वेदना होत होत्या.’
या सततच्या शोषण आणि छेडछाडीमुळे तिच्या आयुष्यावर मोठा परिणाम झाला. या सगळ्या परिस्थितींना तोंड देण्यासाठी तिच्या आईने तिला लहानपणापासूनच बाहेरच्या जगासाठी तयार केल्याचे तिने सांगितले.
अभिनेत्रीच्या पाठीमागे अश्लील कृत्य
‘माझी आई मला शिकवायची की रस्त्यावर कसं चालायचं. पुरुषांचे हात बघत चालायचं. जरा विचार करा, एखाद्या आईला आपल्या मुलीला अशा गोष्टी शिकवाव्या लागतात हे किती भयंकर आहे.’ इतकंच नाही तर तिने अनेक वेळा अश्लील कृत्यांनाही सामोरं जावं लागल्याचं सांगितलं.
‘अनेकदा मी मागे वळून पाहिलं आहे आणि कुणीतरी पुरुष आपले खासगी अवयव दाखवत असल्याचं दिसलं आहे. त्या वेळी मला त्याचा अर्थ कळत नव्हता. खूप उशिरा समजतं की अशा अनुभवांचा आपल्या मनावर आणि शरीरावर किती खोल परिणाम होतो.’ पार्वतीने शेअर केलेला हा अनुभव केवळ तिची वैयक्तिक कहाणी नसून समाजातील अनेक मुली आणि महिलांचे वास्तव अधोरेखित करणारा आहे.