
2001 मध्ये ‘मिसेस वर्ल्ड’चा किताब जिंकणारी पहिली भारतीय महिला अदिती गोवित्रीकर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अत्यंत धक्कादायक प्रसंगाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. या मुलाखतीत सुरक्षितता, बालपणीचे आघात आणि या घटनांचा नंतर तिच्या आयुष्यावर कसा परिणाम झाला, याविषयी तिने सांगितलं. अदितीने असाही खुलासा केला की तिचे सर्वांत त्रासदायक अनुभव मुंबईत नव्हे तर पनवेलमध्ये आले. तिथे तिला काही गैरवर्तनाचे अनुभव आले होते आणि या सर्व गोष्टी हाताळण्यासाठी तिला बराच वेळ लागला.
‘हॉटरफ्लाय’ला दिलेल्या मुलाखतीत अदिती म्हणाली, “खरं सांगायचं तर, जर तुम्ही मला सुरक्षिततेच्या बाबतीत विचाराल तर मला प्रत्यक्षात पनवेलमध्ये जास्त त्रासदायक घटनांना सामोरं जावं लागलं. तिथे मला काही गैरवर्तनाचे अनुभव आले आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी मला खूप वेळ लागला. मी मोठी होईपर्यंत त्याबद्दल कोणालाच काही बोलली नाही. मी जेमतेम सहा किंवा सात वर्षांची असताना या घटना घडल्या होत्या. धक्कादायक बाब म्हणजे गुन्हेगारांपैकी एक माझ्या वडिलांचा मित्रच होता. तर दुसरी घटना एका अनोळखी व्यक्तीशी संबंधित होती.”
“मी बारावीत अग्रवाल क्लासेससाठी दादरला येत होती. त्यावेळी लोकल ट्रेन हा पर्याय माझ्यासाठी उपलब्ध नव्हता, म्हणून मी बसने प्रवास करत होती. सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करताना तुम्ही बऱ्याच गोष्टी शिकता. माझ्या दोन्ही बाजूंना मोठ्या पिशव्या ठेवायची. पिशवीत मी हार्डबोर्ड पुस्तकं ठेवायची आणि त्या पिशव्या ढालप्रमाणे धरायची. ते खरंच माझं संरक्षण होतं. जर मला जागा मिळाली तर मी दोन्ही बाजूला एक-एक पिशवी ठेवायची, जेणेकरून कोणीही मला स्पर्श करू नये. महत्त्वाचं म्हणजे, अत्याचार बहुतेकदा ओळखीच्या चेहऱ्यांकडूनच होतात. माझ्या बाबतीत, एका घटनेत कुटुंबातील एका ओळखीच्या व्यक्तीचा समावेश होता. एकदा माझ्यासोबत बाजारात अशी घटना घडली होती आणि काय घडलं हे मला त्यावेळी नीट समजलंसुद्धा नव्हतं. पण त्यामुळे मी खूप हादरले होते. ती भावनाच भयावह आहे”, अशा शब्दांत ती पुढे व्यक्त झाली.
या घटनांबद्दल व्यक्त होण्यासाठी अदितीला जवळपास 15 वर्षे लागली. या अनुभवांचा परिणाम अजूनही कायम असल्याचं तिने कबूल केलं. आजही सार्वजनिक ठिकाणी कोणी जवळ आलं तर माझं शरीर आपोआप प्रतिक्रिया देतं. पण मी आता ते सर्व सहत करत नाही, असं ती ठामपणे म्हणाली.