
सोशल मीडियामुळे जगभरात कनेक्टिव्हिटी प्रचंड प्रमाणात वाढली असली तरी त्याचे दुष्परिणामही अनेकांना भोगावे लागत आहेत. विशेषकरून सेलिब्रिटींना या गोष्टीचा अधिक फटका बसतो. अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चननेही अशा गोष्टींना वैतागून अखेर कोर्टात धाव घेतली आहे. आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या हक्कांचं रक्षण करावं आणि काही लोकांना माझं नाव, प्रतिमा, एआय जनरेटेड पॉर्नोग्राफिक कंटेंट वापरण्यापासून रोखावं, अशी विनंती तिने कोर्टासमोर केली आहे. कोणत्याही परवानगीशिवाय तिचे फोटो काही लोकांकडून आणि ब्रँड्सकडून व्यावसायिक फायद्यासाठी वापरले जात असल्याचा आरोप तिने केला. इतकंच नव्हे तर ‘माझे फेक इंटिमेट फोटो बनवून ते कॉफीचा कप आणि इतर वस्तू विकण्यासाठी वापरले गेले. स्क्रीनशॉट्समध्ये माझ्या फोटोंशी छेडछाड करण्यात आली. माझे एआय जनरेटेड आक्षेपार्ह कंटेट बनवण्यात आले. या सर्व गोष्टींवर आळा बसावा, यासाठी माझ्या व्यक्तीमत्त्वाच्या अधिकारांचं रक्षण करा’, अशी मागणी ऐश्वर्याने केली आहे.
ऐश्वर्याच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि प्रसिद्धीच्या अधिकारांचा गैरवापर रोखण्यासाठी एक आदेश पारित केलं जाईल, असं दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी सूचित केलं. त्याचप्रमाणे विविध संस्थांना तिच्या संमतीशिवाय तिचं नाव, फोटो आणि आवाज व्यावसायिक फायद्यासाठी वापरण्यापासून रोखण्यात येईल. ऐश्वक्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या अधिकारांचं उल्लंघन करणाऱ्या URL काढून टाकण्यासाठी पुढील निर्देश जारी करणार असल्याचं न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या खंडपीठाने म्हटलंय.
ऐश्वर्याने प्रवीण आनंद आणि ध्रुव आनंद यांच्यामार्फत खटला दाखल केला. विविध संस्था तिचं नाव, आवाज आणि व्हिडीओ बेकायदेशीर व्यावसायिक हेतूंसाठी वापरून तिच्या व्यक्तीमत्त्वाच्या अधिकारांचं उल्लंघन करत असल्याचं, त्यांनी म्हटलंय. त्याचप्रमाणे अश्लील व्हिडीओंमध्ये तिचे फोटो एआयद्वारे मॉर्फ केले जात आहेत, असाही आरोप त्यांनी केला.
एखाद्या कलाकाराने अशा पद्धतीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या आणि प्रसिद्धीच्या अधिकारांचं संरक्षण करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी मे महिन्यात अभिनेता जॅकी श्रॉफने असाच खटला दाखल केला होता. तर 2023 मध्ये अभिनेते अनिल कपूर यांनी त्यांच्या ‘झकास’ या गाजलेल्या डायलॉगसह त्यांचं नाव, फोटो, आवाज आणि व्यक्तिमत्त्वाच्या इतर गुणधर्मांचा गैरवापर करण्यास मनाई केली होती. नोव्हेंबर 2022 मध्ये अमिताभ बच्चन यांनीसुद्धा याच कारणासाठी कोर्टात धाव घेतली होती.