राज ठाकरेंमुळे अक्षय कुमारला मिळाली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका

| Updated on: Nov 03, 2022 | 12:37 PM

अक्षय कुमारचं मराठी सिनेसृष्टीत पदार्पण; एकनाथ शिंदे, राज ठाकरेंच्या उपस्थितीत घोषणा

राज ठाकरेंमुळे अक्षय कुमारला मिळाली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका
अक्षय कुमारचं मराठी चित्रपटात पदार्पण
Image Credit source: Twitter
Follow us on

मुंबई- बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अर्थात अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या आगामी प्रोजेक्टची मोठी घोषणा केली. ही घोषणा यासाठी मोठी आहे कारण तो मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करतोय. पदार्पणाच्या या चित्रपटात अक्षय कुमार हा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित या चित्रपटाचं नाव ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ असं आहे. बुधवारी मोठ्या कार्यक्रमात या चित्रपटाची घोषणा झाली. “छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणं हे खूप मोठं आव्हान आहे. या भूमिकेसाठी मी कठोर मेहनत करेन,” असं अक्षय यावेळी म्हणाला.

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत अक्षय म्हणाला, “मला छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका ही राज ठाकरेंमुळे मिळाली. त्यांनी मला आश्वासन दिलं की तू ही भूमिका साकारू शकतोस. माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. या भूमिकेसाठी मी माझं सर्वस्व अर्पण करेन.”

हे सुद्धा वाचा

बुधवारी पार पडलेल्या या कार्यक्रमात अक्षय कुमार आणि महेश मांजरेकर यांच्याशिवाय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरेसुद्धा उपस्थित होते. अक्षयच्या भूमिकेविषयी महेश मांजरेकर म्हणाले, “अक्षयसोबत काम करण्याची माझी खूप इच्छा होती. या भूमिकेसाठी मी त्याच्याशिवाय दुसरा कोणत्याच अभिनेत्याचा विचार करू शकत नाही. आम्हाला ठराविक व्यक्तिमत्त्व आणि लूक हवा होता. हिंदू राजाची भूमिका साकारण्यासाठी अक्षय परफेक्ट आहे.

निर्मात्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लूकमधील अक्षयचा फोटो सर्वांसमोर सादर केला. या लूकवर टीम अजून काम करणार असल्याचं अक्षयने यावेळी स्पष्ट केलं. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हा चित्रपट मराठीसोबतच हिंदी, तमिळ आणि तेलुगू या भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. कुरेशी प्रॉडक्शन्स निर्मित हा चित्रपट पुढच्या वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.