अक्षय कुमारचा 26 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; ट्रोल होताच म्हणाला “खऱ्या आयुष्यातही..”

दिग्दर्शक प्रियदर्शन आणि अक्षय कुमार बऱ्याच वर्षांनंतर 'भूत बंगला' या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र येत आहेत. त्यांचा हा हॉरर कॉमेडी चित्रपट येत्या 10 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. यामध्ये 58 वर्षीय अक्षय कुमार त्याच्यापेक्षा वयाने 26 वर्षांनी लहान वामिका गब्बीसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.

अक्षय कुमारचा 26 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; ट्रोल होताच म्हणाला खऱ्या आयुष्यातही..
Akshay Kumar and Wamika Gabbi
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 26, 2026 | 9:21 AM

अभिनेता अक्षय कुमार पुन्हा एकदा हॉरर कॉमेडी चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रियदर्शन दिग्दर्शित ‘भूत बंगला’ हा चित्रपट येत्या 10 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री वामिका गब्बीची मुख्य भूमिका आहे. नुकतंच या चित्रपटातील दोघांचं एक रोमँटिक गाणं लाँच झालं. या गाण्यात 58 वर्षीय अक्षय त्याच्यापेक्षा वयाने 26 वर्षांनी लहान वामिकासोबत रोमान्स करताना दिसला. यावरून सोशल मीडियावर विविध चर्चांना उधाण आलं. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत पत्रकारांनीही अक्षयला त्यावरून प्रश्न विचारला. यावेळी उत्तर देताना अक्षयने पत्रकारांना प्रतिप्रश्न विचारला की, “हॉलिवूड चित्रपटांमध्ये असं काही होत नाही का?”

‘न्यूज 18’ला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत अक्षय कुमारने या मुद्द्याला एक विनोद म्हणून फेटाळून लावलं आणि ही कथेची गरज असल्याचं सांगितलं. 26 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स करण्याच्या निर्णयाबद्दल पुढे तो म्हणाला, “हॉलिवूडमध्ये असं होत नाही का? आपण हे याआधी पाहिलं नाही का? हॉलिवूडमध्ये असं घडतं. कधीकधी ही कथेची गरज असते. खऱ्या आयुष्यातही अनेकजण स्वत:पेक्षा वयाने मोठ्या किंवा लहान असलेल्या जोडीदाराशी लग्न करतात.” तर यावेळी दिग्दर्शक प्रियदर्शननेही त्याची बाजू मांडली. प्रेक्षकांनी कलाकारांना त्यांच्या पात्रांच्या रुपात पाहिलं पाहिजे, असं त्याने सांगितलं.

चित्रपटाच्या कास्टिंगबद्दल प्रियदर्शन म्हणाला, “एमजीआर आणि एनटीआर यांच्यासारखे लोक म्हणायचे की खरं वय आणि पडद्यावरील वय यात खूप फरक असतो. कलाकाराचं पडद्यावरील वय हे त्याचं वास्तविक वय नसतं. पण लोक तुम्हाला तुमच्या पडद्यावरील वयामुळे तुम्हाला स्वीकारतात. मला त्यात काही अडचण वाटत नाही. जेव्हा मी शूटिंग करतो, तेव्हा कधीकधी मला असं वाटतं की ही जोडी योग्य नाही आणि याचं वयातील अंतराशी काही घेणंदेणं नसतं. तेव्हा मी अक्षय किंवा तब्बूसोबत शूटिंग करतो, तेव्हा मला त्यात कोणतीस समस्या जाणवत नाही आणि जेव्हा प्रेक्षक चित्रपट पाहतात, तेव्हा त्यांनासुद्धा कोणतीच समस्या वाटत नाही. हे त्यांच्या भूमिका आणि स्क्रीनवरील वयामुळे आहे.”

बॉलिवूडमध्ये एखाद्या मोठ्या वयाच्या हिरोने त्याच्यापेक्षा कित्येत वर्षांनी लहान अभिनेत्रीशी काम करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान यांनी त्यांच्यापेक्षा बऱ्याच वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीसोबत ऑनस्क्रीन रोमान्स केला आहे. इतकंच नव्हे तर ‘धुरंधर’ या चित्रपटात रणवीर सिंहने त्याच्यापेक्षा 20 वर्षांनी लहान सारा अर्जुनसोबत काम केलं आहे.

Follow Us