
‘हनुमान’ या गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत वर्मा पुन्हा एकदा एक नवीन पौराणिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. या चित्रपटाचं नाव ‘महाकाली’ आहे. या चित्रपटातील एका मुख्य भूमिकेचा फर्स्ट लूक नुकताच लाँच करण्यात आला आहे. ही भूमिका आहे असुरांचे गुरू शुक्राचार्य यांची. त्यांच्या भूमिकेत एका प्रसिद्ध अभिनेत्याची वर्णी लागली आहे. शुक्राचार्य यांच्या लूकमध्ये या अभिनेत्याला ओळखणंही कठीण आहे, इतकं दमदार हे ट्रान्सफॉर्मेशन आहे. या अभिनेत्याने विकी कौशलच्या ‘छावा’मध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती आणि त्यातही त्याला ओळखणं कठीण होतं.
हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून अक्षय खन्ना आहे. प्रशांत वर्मा यांनी अक्षय खन्नाचा हा लूक शेअर केला आहे. ‘देवांच्या सावलीत बंडाची सर्वांत तीव्र ज्वाळा उठली. अक्षय खन्नाला शाश्वत असुरगुरू शुक्राचार्य म्हणून सादर करत आहोत’, असं कॅप्शन देत त्याने हा जबरदस्त फर्स्ट लूक शेअर केला आहे. लांब पांढरे केस, मोठी दाढी, ऋषींचा वेश आणि तेजस्वी डोळा.. असा हा लूक आहे. शुक्राचार्यांच्या लूकमध्ये अक्षय खन्नाला ओळखणं कठीण आहे.
या चित्रपटात इतर कोणकोणते कलाकार असतील, याची माहिती अद्याप उघड करण्यात आली नाही. फक्त अक्षयचा लूक समोर आला आहे. या लूकची नेटकऱ्यांकडून खूप प्रशंसा होतेय. अक्षयच्या या अनोख्या भूमिकेमुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. शुक्राचार्य यांच्या ज्ञानाने देव आणि राक्षस दोघांचंही भविष्य घडवलं. सनातन विद्येचे आचार्य, मृत्यू संजीवनी मंत्राचे संरक्षक, जीवन देण्याची शक्ती असलेले अध्यात्मिक गुरू आणि अजेय रणनीतीकार.. असं त्यांना ओळखलं जातं. या चित्रपटाच्या निमित्ताने अक्षय तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करतोय.
याआधी ‘छावा’ चित्रपटात अक्षयने क्रूर औरंगजेबाची भूमिका साकारली होती. या भूमिकेतही त्याला ओळखणं कठीण झालं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा दमदार भूमिकेतून तो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अक्षयच्या करिअरमधील ही अत्यंत वेगळी भूमिका आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये त्याच्या या लूकची खूप चर्चा होत आहे.