
बॉलिवूडमध्ये 2000 दशकात बरेच कल्ट क्लासिक कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. अक्षरश: पोट धरून हसायला लावणाऱ्या चित्रपटांमध्ये अभिनेत्री म्हणून दिग्दर्शकांची एकीलाच सर्वाधिक पसंती होती. ती म्हणजे रिमी सेन. ‘फिर हेरा फेरी’, ‘हंगामा’, ‘धूम’, ‘जॉनी गद्दार’, ‘संकट सिटी’ आणि ‘दे ताली’ यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये रिमीने भूमिका साकारल्या आहेत. एकानंतर एक हिट चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर रिमी सेन अचानक इंडस्ट्रीतून गायब झाली. सलमान खानपासून आमिर खानपर्यंत अनेक मोठमोठ्या कलाकारांसोबत काम केलेल्या रिमीला नंतर फार कमी ऑफर्स मिळू लागले होते. आता बऱ्याच काळापासून चित्रपटांपासून दूर असलेल्या रिमीने नवा व्यवसाय सुरू केला आहे. ती आता पूर्ण वेळ रिअल इस्टेटमध्ये काम करू लागली आहे.
रिमी सेनने ‘बिल्डकॅप्स रिअल इस्टेट एलएलसी’ला दिलेल्या मुलाखतीत रिमी सेन दुबईत रिअल इस्टेट एजंट बनण्याच्या निर्णयाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. भारताच्या तुलनेत दुबईत रिअल इस्टेटमध्ये काम करणं किती फायदेशीर आहे, याविषयीही तिने सांगितलं. भारत आता बिझनेससाठी अनुकूल राहिला नाही, असं तिने म्हटलंय.
याविषयी रिमी सेन पुढे म्हणाली, “दुबई तुमचं मनापासून स्वागत करतं. याच कारणामुळे इथली 95 टक्के लोकसंख्या ही प्रवाशांची आहे आणि इतर लोक संयुक्त अरब अमिरातीचे आहेत. इथे मशिदी आहेत, मंदिरं आहेत आणि इथे सर्वांची काळजी घेतली जाते. लोकांचं आयुष्य उत्तम, सोपं आणि आरामदायी बनवणं हे या शहराचं उद्दिष्ट आहे. ही गोष्ट आपल्याला आपल्या देशात पहायला मिळत नाही. कारण आपल्या देशात रातोरात सरकारकडून निती बदलल्या जातात, ज्यामुळे लोकांचं आयुष्य आणखी कठीण होतं. हजारो प्रकारांचे टॅक्स, अगणित समस्या आणि आता देश बिझनेस करण्याच्या लायक राहिलाच नाही.”
दुबईत रिअल इस्टेट मार्केट का उत्तम आहे, याविषयी रिमीने सांगितलं, “इथे रिअल इस्टेट मार्केट चांगलं काम करतं कारण इथे शिस्त आहे. तुम्हाला फक्त एजंट आणि एजन्सींसोबत काम करावं लागेल. डेव्हलपर्स त्यांचं काम करतात, एजन्सी त्यांचं काम करतात. इथे एक सुनियोजित व्यवस्था आहे.”
या मुलाखतीत रिमी सेन प्लास्टिक सर्जरीबद्दलही मोकळेपणे व्यक्त झाली. रिमीने सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी स्वत:चे फोटो पोस्ट केले होते. हे फोटो पाहून तिने प्लास्टिक सर्जरी केली की काय, अशा चर्चांना उधाण आलं होतं. या चर्चांवर ती म्हणाली, “जर लोकांना वाटत असेल की मी प्लास्टिक सर्जरी केली आहे तर ती चांगलीच गोष्ट आहे. मी फक्त फिलर्स आणि बोटॉक्स केलं आहे. पीआरपी ट्रीटमेंटसुद्धा घेतली आहे, याव्यतिरिक्त काही केलेलं नाही. गुन्हा केल्यानंतर फरार असलेल्या व्यक्तीला प्लास्टिक सर्जरीची गरज असते. भारताबाहेर अनेक उत्कृष्ट डॉक्टर आहेत, जे फेस लिफ्टिंगमध्ये तज्ज्ञ आहेत. पण मी वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतर याचा विचार करेन. सध्या माझ्यासाठी एवढे उपचार पुरेसे आहेत. काही ट्रिटमेंट आणि रोजच्या स्कीनकेअरने तुम्हीसुद्धा चांगली त्वचा मिळवू शकता.”