
Amaal Malik : प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अमाल मलिक त्याच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत असतो. सध्या तो बिग बॉसच्या घरात आहे. परंतु त्यापूर्वी सोशल मीडियावरील त्याच्या एका पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. या पोस्टमध्ये त्याने कुटुंबीयांपासून सर्व संबंध तोडत असल्याचं जाहीर केलं होतं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अमालचे वडील डब्बू मलिक त्याच्या नैराश्याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाले. अमाल आणि अरमान मलिक हे संगीतकार अनु मलिक यांचे पुतणे आहेत.
आरजे सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत डब्बू मलिक म्हणाले, “मला समजून चुकलं होतं की बऱ्याच पातळीवर गोष्टी चुकीच्या घडत आहेत. मी माझ्या कुटुंबात सर्वांना सांगत होतो की कदाचित अमाल चुकीच्या दिशेने जात आहे. आपण त्याच्याकडे कदाचित दुर्लक्ष करत आहोत आणि अरमानकडे आपण अधिक लक्ष देतोय. कुठे तरी आपण चुकतोय, याची जाणीव मला झाली होती. परंतु बरं झालं की अमालने सोशल मीडियावरच थेट पोस्ट लिहिली की तो कुटुंबीयांशी सर्व संबंध तोडतोय. यावरून आम्ही जो विचार करत होतो, ते खरं असल्याचं तरी स्पष्ट झालं.”
“ती पोस्ट वाचल्यानंतर मी अमालकडे गेलो आणि जवळपास 25 दिवस त्याच्या बेडवर होतो. त्याला समजतच नव्हतं की बाबांना इथून कसं दूर करू? मला तर आधी वाटलं की हा पब्लिसिटी स्टंट आहे. अमाल मला सांगत होता की तुम्ही इथून दूर जा, परंतु मी तिथून किंचितसुद्धा हललो नव्हतो. त्यानंतर मी त्याची एक एक कहाणी ऐकत गेलो. तो बिग बॉसच्या घरात जाईपर्यंत मला त्याची काळजी वाटत होती. परंतु आता मी खुश आहे”, असं त्यांनी पुढे म्हटलंय.
अमाल मलिकने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित कुटुंबीयांशी सर्व संबंध तोडत असल्याचं जाहीर केलं होतं. कुटुंबीयांकडून वाईट वागणूक मिळत असल्याने नैराश्याचा सामना करत असल्याचंही त्याने म्हटलं होतं. त्यानंतर डब्बू मलिक यांनी अमालसोबतचा फोटो शेअर करत भावूक पोस्ट लिहिली होती.