अभिनेत्रींना स्टारडमचा भ्रम, त्यांचा खर्च तर..; अमीषा पटेलने साधला निशाणा

Ameesha Patel: अमीषाच्या या वक्तव्यामुळे बॉलिवूडमधील कलाकारांच्या वैयक्तिक टीमचा खर्च, स्टारडम आणि निर्मात्यांवर पडणारा आर्थिक भार याबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

अभिनेत्रींना स्टारडमचा भ्रम, त्यांचा खर्च तर..; अमीषा पटेलने साधला निशाणा
Ameesha Patel
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 21, 2026 | 11:16 AM

बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेल पुन्हा एकदा तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना अमीषाने इंडस्ट्रीतील कलाकारांच्या मोठ्या एन्टॉरेजजबाबत थेट भाष्य केलं. ‘एन्टॉरेज कॉस्ट्स म्हणजे चित्रपट निर्मितीच्या सेटवर एखाद्या सेलिब्रिटीच्या वैयक्तिक कर्मचाऱ्यांचा पगार आणि त्यांच्या जीवनशैलीशी संबंधित गरजा पूर्ण करण्यासाठी येणारा दैनंदिन खर्च. विशेषतः अभिनेत्रींवर टिप्पणी करताना तिने काही जणी आपल्या स्टारडमचा अंदाज वास्तवापेक्षा मोठा लावत असल्याचं म्हटलं आहे. अमीषा पटेलने रविवारी ‘Ask Me Anything’ सेशनमध्ये चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी एका चाहत्याने कलाकारांनी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मोठ्या संख्येने वैयक्तिक टीम सोबत नेणं आणि त्याचा खर्च निर्मात्यांनी करणं योग्य आहे का, असा प्रश्न विचारला. यावर अमीषाने आपलं मत अगदी स्पष्टपणे मांडलं.

काय म्हणाली अमीषा?

‘अनेक अभिनेत्री त्यांच्या स्टारडमचा (प्रसिद्धीचा) स्वीकार करायलाच तयार नसतात. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्यांच्यासोबत असणारा लवाजमा (ज्याचा खर्च निर्मात्याला करावा लागतो) हा त्यांच्या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईपेक्षाही मोठा असतो. आशा आहे की, निर्मात्याचा पैसा खर्च न होताही त्या आपल्या सामान्य आयुष्यात असाच लवाजमा सोबत ठेवतील’, असं लिहित तिने हसण्याचे इमोजी पोस्ट केले.

अमीषाची पोस्ट-

एन्टॉरेजमध्ये नेमकं कोण असतं?

बॉलिवूडमध्ये एखादा अभिनेता किंवा अभिनेत्री प्रमोशनसाठी बाहेर पडताना त्यांच्या टीममध्ये मेकअप आर्टिस्ट, हेअर स्टायलिस्ट, फॅशन स्टायलिस्ट, मॅनेजर आणि इतर कर्मचारी असू शकतात. कलाकारांच्या कामाचा आणि सार्वजनिक उपस्थितीचा विचार करता अशा टीमची गरज असू शकते. मात्र, या सर्वांचा खर्च कोण करणार, यावर अमीषाने प्रश्न उपस्थित केला आहे. तिच्या म्हणण्यानुसार, निर्मात्यांनी चित्रपटाच्या बजेटचा विचार करताना अशा खर्चाकडेही लक्ष द्यायला हवं.

अमीषाने याच संवादात तिच्या आगामी प्रोजेक्ट्सबाबतही भूमिका स्पष्ट केली. कमी किमतीच्या तिकिटांवर किंवा मोठ्या ऑफर्सच्या आधारावर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांमध्ये काम करण्यापेक्षा काही वर्षांनी एखादा मोठा आणि लक्षवेधी चित्रपट करण्याला प्राधान्य देत असल्याचं तिने सांगितलं.

अमीषा पटेलला तिच्या ‘गदर 2’ या चित्रपटातून पुन्हा मोठं यश मिळालं होतं. सनी देओलसोबतच्या या चित्रपटात तिने सकीनाची भूमिका साकारली होती. 2024 मध्ये ती ‘तौबा तेरा जलवा’ या सिनेमात दिसली होती. मात्र, त्यानंतर तिच्या पुढील चित्रपटाची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us