मोठी चूक झाली.. माधुरीने क्लिप दाखवताच अमिताभ बच्चन अक्षरश: ओशाळले, पहा व्हिडीओ

अभिनेत्री माधुरी दीक्षितने 'कौन बनेगा करोडपती 18'च्या सेटवर अमिताभ बच्चन यांची एक जुनी क्लिप दाखवली. त्यानंतर सेटवर एकच हशा पिकला. त्यापूर्वी अमिताभ बच्चन यांनी तिची माफी मागितली होती.

मोठी चूक झाली.. माधुरीने क्लिप दाखवताच अमिताभ बच्चन अक्षरश: ओशाळले, पहा व्हिडीओ
माधुरी दीक्षित आणि अमिताभ बच्चन
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 07, 2026 | 12:13 PM

Amitabh Bachchan: ‘कौन बनेगा करोडपती 18’च्या मंचावर बॉलिवूडमधील दोन दिग्गज कलाकार एकत्र आले आणि वातावरण चांगलंच रंगतदार झालं. अमिताभ बच्चन आणि माधुरी दीक्षित यांची ही खास भेट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. विशेष म्हणजे बिग बींनी माधुरी यांच्यासमोर चक्क माफी मागितली. मात्र ही माफी कोणत्याही गंभीर कारणासाठी नव्हती, तर एका जुन्या गाण्याच्या डान्स स्टेप्सशी संबंधित होती. माधुरीने त्यानंतर अमिताभ बच्चन यांचा जुना व्हिडीओ दाखवताच सेटवर एकच हशा पिकला.

बिग बींनी माधुरीची माफी का मागितली?

‘KBC 18’च्या एका प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन माधुरी दीक्षितशी गप्पा मारताना दिसतात. यावेळी त्यांनी माधुरीच्या लोकप्रिय ‘एक दो तीन’ या गाण्याचा उल्लेख केला. 1988 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तेजाब’ चित्रपटातील हे गाणं माधुरीच्या कारकिर्दीतील सर्वात प्रसिद्ध गाण्यांपैकी एक आहे. अमिताभ यांनी मजेशीर अंदाजात सांगितलं की, एका चित्रपटात त्यांनी ‘एक दो तीन’मधील माधुरीच्या डान्स स्टेपची नक्कल केली होती. आपल्या त्या कृतीला त्यांनी गंमतीने ‘मोठी गुस्ताखी’ म्हटलं आणि माधुरीकडे माफी मागितली. बिग बींचा हा अंदाज पाहून माधुरीही हसू लागली.

Loading...

पहा व्हिडीओ-

माधुरीने दाखवली बिग बींची जुनी क्लिप

अमिताभ बच्चन यांनी स्वतःच आपल्या जुन्या डान्सचा किस्सा सांगितल्यानंतर माधुरीनेही संधी साधली. तिने बिग बींना विचारलं की, “आम्हीही दाखवू का?” त्यानंतर स्क्रीनवर अमिताभ बच्चन यांचा जुना व्हिडीओ दाखवण्यात आला. या क्लिपमध्ये अमिताभ बच्चन एका जुन्या चित्रपटातील प्रसंगात ‘एक दो तीन’च्या प्रसिद्ध स्टेपची नक्कल करताना दिसतात. स्वतःचा हा जुना व्हिडीओ स्क्रीनवर पाहिल्यानंतर बिग बींनाही हसू आवरता आलं नाही. त्यांनी चेहऱ्यावर हात ठेवत लाजल्यासारखी प्रतिक्रिया दिली. आपल्या जुन्या डान्सकडे पाहून त्यांनीही मजेशीरपणे प्रतिक्रिया दिली आणि सेटवर हास्याची लाट पसरली.

माधुरीचा डान्स पाहून बिग बी भारावले

याच विशेष एपिसोडमध्ये माधुरी दीक्षितने तिच्या नृत्याची झलकही दाखवली. अमिताभ बच्चन यांनी ‘कंप्यूटर जी’ला माधुरीसाठी गाणं वाजवण्याची विनंती केली. त्यानंतर ‘काहे छेड मोहे’ हे ‘देवदास’मधील गाणं सुरू झालं. माधुरीने आपल्या जागेवर बसूनच अप्रतिम हावभाव आणि नृत्याच्या मुद्रांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यांचा परफॉर्मन्स पाहून अमिताभ बच्चन प्रभावित झाले आणि त्यांनी टाळ्या वाजवत माधुरीचं कौतुक केलं.

लवकरच ‘कोण होणार करोडपती’च्या सूत्रसंचालकपदी माधुरी

माधुरी दीक्षित लवकरच मराठी प्रेक्षकांसाठी ‘कोण होणार करोडपती’ या शोचं सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. त्यामुळे KBC 18 मधील तिची ही उपस्थिती आणखी खास ठरली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us