तुम्ही हे सगळं सोडून गावी का गेलात? अमिताभ बच्चन यांच्या प्रश्नावर नाना पाटेकरांचं भन्नाट उत्तर

एकेदिवशी अमिताभ बच्चन यांनी नाना पाटेकरांना विचारलं की, तुम्ही हे सगळं सोडून गावी का गेलात? त्यावर त्यांना काय उत्तर दिलं, याविषयीचा खुलासा नाना पाटेकरांनी नुकत्याच एका कार्यक्रमात केला.

तुम्ही हे सगळं सोडून गावी का गेलात? अमिताभ बच्चन यांच्या प्रश्नावर नाना पाटेकरांचं भन्नाट उत्तर
Nana Patekar and Amitabh Bachchan
Image Credit source: Instagram
| Updated on: May 26, 2025 | 9:08 AM

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर हे अत्यंत साधं आयुष्य जगण्यासाठी ओळखले जातात. शहरातली धावपळ, दगदग त्यांना आवडत नाही. शहरामध्ये श्वास घेता येत नाही, असं ते म्हणतात. नुकत्याच एका कार्यक्रमात त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा एक किस्सा सांगितला. हे सगळं सोडून तुम्ही तिथे (गावी) का गेलात, असा प्रश्न बिग बींनी नानांना विचारला होता. त्यावर नानांनी त्यांना काय उत्तर दिलं, हे त्यांनी या कार्यक्रमात संगितलं. माजी आयएएस अधिकारी, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या सामाजिक कार्यावर ‘निढळ: ग्रामविकासाचा दळवी पॅटर्न’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं होतं. याच कार्यक्रमात नाना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

नाना म्हणाले, “अमिताभ बच्चन त्यादिवशी बोलत होते की हे सगळं सोडून तुम्ही तिथे का गेलात? मी त्यांना म्हटलं की, तुम्ही तिथे या म्हणजे तुम्हाला कळेल की मी हे सगळं का सोडलं? कारण तुम्हाला माहीतच नाही. तुमच्याकडे सगळं आहे, पण काय नाहीये हे तुम्हाला माहीत नाही. कारण जे तुमच्याकडे आहे ते सगळं नाहीये. आम्हाला तिथे नुसता निसर्ग नाही तर माणसंही भेटतात, जनावरंही भेटतात. माझ्याकडे दहा गायी आहेत, बैल आहेत, सहा कुत्री आहेत आणि नुसतं हिरवंगार आहे.”

“मी नुकतीच बोअर घेतली आणि त्याला तीन इंची पाणी लागलं, तेव्हा मी केवढा हरखलो! आता माझा आनंद त्यात आहे, मी नवीन गाडी घेतली त्यात नाही. ज्याला आहे त्याचं चुकतंय अशातला काही भाग नाही. पण मला हे आवडतं. रस्त्यावर कुठे भांडण सुरु असेल तर मी गाडीतून उतरतो आणि त्यांच्याशी बोलतो. मला हे सगळं करावंसं वाटतं. कारण ती मला माझी मुलं वाटतात. मुळात लहानपणी माझी वृत्ती अतिशय वांड होती. होती म्हणजे आहे, ती गेली नाही,” अशा शब्दांत ते व्यक्त झाले.

यावेळी नानांनी आणखी एका नटाचा किस्सा सांगितला. “मी आता एका नटासोबत काम करत होतो. त्याने विचारलं, तुम्ही इतके साधे कसे असता? मी म्हटलं साधे कसलं? देवाने इतकं काही दिलेलं आहे. तो म्हणाला, तुमचे कपडे इतके साधे.. मी म्हटलं, हे सर्वांत महाग कपडे आहेत, खादी आहे. याच्यापेक्षा महाग कपडे नाहीत. हे रोज धुवावे लागतात. तुझ्या जीन्ससारखे नाही, महिनाभरानं धुवावं लागणारे”, अशी गंमत त्यांनी केली.