Nitesh Pandey | एकाच आठवड्यात टीव्ही इंडस्ट्रीला तिसरा धक्का; ‘अनुपमा’ फेम नितेश पांडे यांचं निधन

वयाच्या 51 व्या वर्षी कार्डिॲक अरेस्टने त्यांचं निधन झालं. नाशिकजवळील इगतपुरी याठिकाणी पहाटे 2 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शूटनिमित्त ते तिथे गेले होते. कार्डिॲक अरेस्ट इतका तीव्र होता की जागीच नितेश यांनी प्राण गमावल्याची माहिती समोर येत आहे.

Nitesh Pandey | एकाच आठवड्यात टीव्ही इंडस्ट्रीला तिसरा धक्का; अनुपमा फेम नितेश पांडे यांचं निधन
Nitesh Pandey
Image Credit source: Instagram
| Updated on: May 24, 2023 | 10:39 AM

इगतपुरी : एकाच आठवड्यात टेलिव्हिजन इंडस्ट्रीला तिसरा मोठा धक्का बसला आहे. 22 मे रोजी अभिनेता आदित्य सिंह राजपूतचं निधन झालं. त्यानंतर मंगळवारी ‘साराभाई वर्सेस साराभाई’ फेम अभिनेत्री वैभवी उपाध्यायने कार अपघातात आपले प्राण गमावले. आता ‘अनुपमा’ मालिकेत धीरज कुमारची भूमिकाची साकारणारे अभिनेते नितेश पांडे यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. वयाच्या 51 व्या वर्षी कार्डिॲक अरेस्टने त्यांचं निधन झालं. नाशिकजवळील इगतपुरी याठिकाणी पहाटे 2 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शूटनिमित्त ते तिथे गेले होते. कार्डिॲक अरेस्ट इतका तीव्र होता की जागीच नितेश यांनी प्राण गमावल्याची माहिती समोर येत आहे.

नितेश यांचा मेहुणा आणि निर्माते सिद्धार्थ नागर यांनी निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. “माझी बहीण अर्पिता खूप मोठ्या धक्क्यात आहे. नितेशचे वडील इगतपुरीला रवाना झाले आहेत. आम्ही सर्वजण सुन्न झालो आहोत. निधनाबद्दल समजल्यानंतर मी माझ्या बहिणीशी एक शब्दही बोलू शकलो नाही”, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

“मीसुद्धा इगतपुरीला जाणार आहे. दिल्लीहून परत येत असताना मला हे वृत्त समजलं. नितेश माझ्यापेक्षा काही वर्षांनी लहान होता. आयुष्य भरभरून जगणारा होता. त्याला हृदयरोगाचा कधी त्रास जाणवला असेल, असं मला वाटत नाही”, असं ते पुढे म्हणाले. शाहरुख खानच्या ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातदेखील त्यांनी भूमिका साकारली होती. याशिवाय दबंग 2, खोसला का घोसला यांमध्ये ते झळकले होते.

नितेश यांचा जन्म 17 जानेवारी 1976 रोजी झाला. नितेश यांनी 90 च्या दशकात थिएटरमध्ये कामाला सुरुवात केली. ‘तेजस’ या मालिकेतून त्यांनी टेलिव्हिजन इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं होतं. ‘मंजिले अपनी अपनी’, ‘अस्तित्व : एक प्रेम कहानी’, ‘साया’, ‘जुस्तजू’ आणि ‘दुर्गेश नंदिनी’ यांसारख्या मालिकांमध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारल्या होत्या. नितेश यांचं स्वत:चं प्रॉडक्शन हाऊससुद्धा आहे. ‘ड्रिम कासल प्रॉडक्शन’ ही त्यांची निर्मिती संस्था आहे. नितेश यांनी अभिनेत्री अश्विनी काळसेकरशी 1998 मध्ये लग्न केलं होतं. मात्र 2002 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर अश्विनीने मुरली शर्माशी लग्नगाठ बांधली. तर नितेश यांनी टीव्ही अभिनेत्री अर्पिता पांडेशी लग्न केलं.