तुझ्याकडे पेशंट्स नाहीत का? महिला डॉक्टरचा अपमान करणं ‘अनुपमा’ला पडलं महागात

'अनुपमा' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रुपाली गांगुली सध्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. रुपालीने एका मुलाखतीत महिला डॉक्टरबद्दल अपशब्द वापरले. त्यानंतर तिच्यावर टीका केली जात आहे.

तुझ्याकडे पेशंट्स नाहीत का? महिला डॉक्टरचा अपमान करणं अनुपमाला पडलं महागात
Rupali Ganguly
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 04, 2024 | 11:12 AM

स्टार प्लस वाहिनीवरील ‘अनुपमा’ ही मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. यामध्ये अभिनेत्री रुपाली गांगुली मुख्य अनुपमाची भूमिका साकारतेय. टीआरपीच्या यादीत ही मालिका नेहमीच अग्रस्थानी असते. लॉकडाऊनच्या काळात सुरू झालेल्या या मालिकेचा मोठा प्रेक्षकवर्ग आहे. या मालिकेमुळे रुपाली सर्वसामान्यांमध्येही ‘अनुपमा’ म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर ‘अनुपमा’चे चाहते तिच्यावर फार नाराज झाले आहेत. मालिकेमुळे रुपालीची प्रतिमा आदर्श महिला म्हणून निर्माण झाली आहे. त्यामुळे कधी तिच्या तोंडून कोणतेही अपशब्द निघतील, अशी अपेक्षा प्रेक्षकांना नाही. प्रेक्षकांच्या या अपेक्षेवर खरी न उतरल्याने रुपाली गांगुली सध्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रुपालीने असं काही म्हटलंय, ज्यामुळे लोक तिच्यावर टीका करू लागले आहेत. तिने एका महिला डॉक्टरसाठी अपशब्द वापरले आहेत. एका मुलाखतीत रुपालीला ट्रोलिंगबद्दल प्रश्न विचारला गेला होता. त्यावर ती म्हणाली, “मला अनेकजण ट्रोल करतात आणि वाईट याचं वाटतं की त्यात महिलाच सर्वाधिक असतात. महिलांना इतका वायफळ वेळ कुठून मिळतो? एक कोणीतरी डॉक्टर आहे, ब्लडी सम गायनॅक (स्त्रीरोगतज्ज्ञ). ती मला सतत शिवीगाळ करत असते. तुझ्याकडे रुग्ण नाहीत का? नसतील तर सांग मी पाठवते. कामात व्यस्त होण्याऐवजी कुठे स्वत:चं डोकं लावतेय?”

रुपालीचे हेच शब्द नेटकऱ्यांना पटले नाहीत. एका महिला डॉक्टरचा अपमान केल्यामुळे तिच्यावर टीका केली जातेय. मालिकेच्या लोकप्रियतेमुळे रुपालीला अहंकार आहे, म्हणूनच ती असे शब्द वापरतेय, असं एकाने म्हटलंय. तर काहींनी रुपालीची बाजू घेत संबंधित डॉक्टरला सुनावलं आहे. सोशल मीडियावर अशा पद्धतीने ट्रोल होण्याची रुपालीची ही काही पहिलीच वेळ नाही. काही दिवसांपूर्वी तिचा एअरपोर्टवरील एक व्हिडीओ समोर आला होता. ज्यामध्ये ती तिच्या पतीच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेताना दिसली. यामुळे काहींनी तिचं कौतुक केलं तर काहींनी हे सर्व दिखावा असल्याचं म्हटलं होतं.