निवेदिता सराफ यांचं नाव कळताच ‘अप्पी आमची कलेक्टर’ फेम अभिनेत्याने मारुतीरायाकडे केली प्रार्थना
साताऱ्याच्या मातीतला अर्जुन आणि कोल्हापूरच्या लाल मातीतला शंकर हे मला जणू भावंडांसारखे वाटतात. त्यामुळे ही दोन्ही पात्रं माझ्या खूप जवळची आहेत. अर्जुननंतर आता शंकरच्या रूपात मी पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येतोय, अशी भावना रोहितने व्यक्त केली.

‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत अर्जुनची भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात घर करणारा अभिनेता रोहित परशुराम पुन्हा एकदा नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘कृष्णाईच्या लेकी’ या नव्या मालिकेतून तो ‘शंकर’ हे दमदार आणि तितकंच भावनिक पात्र साकारणार आहे. या नव्या प्रवासाबद्दल, भूमिकेच्या तयारीबद्दल, सहकलाकारांबद्दल आणि प्रेक्षकांच्या अपेक्षांबद्दल रोहितने मनमोकळ्या गप्पा मारल्या आहे. “मी शंकर हे पात्र साकारतोय. गावच्या सावकार मातोश्रींचा मुलगा, व्यायामाची प्रचंड आवड असलेला कोल्हापुरातला रांगडा गडी. तो एका बिनधास्त, सुंदर आणि मनमोकळ्या मुलीला पाहताक्षणी तिच्या प्रेमात पडतो. त्यानंतर त्याच्या आयुष्यात होणारे सकारात्मक बदल, प्रेम आणि आई या दोघांमध्ये समतोल साधताना त्याची होणारी गोड दमछाक आणि त्याचा प्रवास मला साकारायला मिळणार आहे,” असं तो म्हणाला.
ऑडिशनचा किस्सा
“माझ्या ऑडिशनचा किस्सा सांगायचा झाला तर ‘कमळी’च्या सेटवर मी आदित्यला, म्हणजेच बंड्याला, सहज भेटायला गेलो होतो. त्यावेळी अनिकेत साने नावाचे दिग्दर्शक झी मराठीवर नवीन मालिका घेऊन येत आहेत असं समजलं आणि त्यांच्या नवीन मालिकेच्या ऑडिशन्स सुरू होत्या. मी लगेच सरांना भेटलो, ऑडिशन दिली. त्यानंतर ऑडिशन्सचे बरेच राऊंड झाले, सीन वर्क झालं आणि अखेर झी मराठीने मला पुन्हा एकदा आपल्या कुटुंबाचा भाग बनवलं. हा माझ्यासाठी खूप आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण होता. मी कोल्हापुरी भाषा आणि त्याचा लहेजा शिकण्याचा प्रयत्न करतोय. त्यासोबतच भरपूर व्यायाम, योग्य आहार आणि नियमित दिनचर्या पाळतोय. स्क्रिप्ट आणि स्क्रिनप्ले यांचं सखोल वाचन करतोय, जेणेकरून शंकरचं पात्र अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येईल आणि ते प्रामाणिकपणे साकारता येईल,” अशा शब्दांत तो व्यक्त झाला.
पहा मालिकेचा प्रोमो-
View this post on Instagram
याविषयी त्याने पुढे सांगितलं, “जवळपास सव्वा वर्ष हिंदी नाटक केल्यानंतर मी पुन्हा एकदा टीव्ही मालिकेत काम करतोय, त्यामुळे मी खूपच उत्साहित होतो. साताऱ्यासोबत माझं एक वेगळंच जिव्हाळ्याचं नातं आहे आणि या मालिकेचा मुहूर्तही साताऱ्यात झाला. त्यामुळे आनंद, उत्सुकता आणि भावुकता अशा अनेक भावना मनात घेऊन मी पहिल्या दिवसाचं शूटिंग केलं. तो दिवस माझ्यासाठी कायम स्मरणात राहील.मालिकेचं शूटिंग मुंबईच्या बाहेर अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य वातावरणात होत आहे. गावाकडचं वातावरण, हिरवाई, मोकळी हवा आणि तिथली साधी माणसं यामुळे काम करताना एक वेगळीच ऊर्जा मिळते. अशा वातावरणात शंकरसारखं पात्र जगणं आणि साकारणं आणखी सहज होतं. संपूर्ण टीमसाठीही हा अनुभव खूप छान आणि संस्मरणीय ठरत आहे.”
“निवेदिता सराफ ताईंच्या प्रोजेक्टमध्ये आपण फक्त हातात भाला घेऊन जरी उभे असलो, तरीही मला सार्थक झाल्यासारखं वाटलं असतं. इथे तर मी मुख्य नायकाची भूमिका करतोय, त्यामुळे मी खूपच भावनिक झालोय. त्यांच्यासोबत सेटवर वावरताना मला माझा संपूर्ण प्रवास आठवतो आणि खरंच मेहनतीला देव फळ देतो यावर पुन्हा एकदा विश्वास बसतो. स्मिता सरवदे ताई, संजय दादा आणि इतर सर्व कलाकार अतिशय अनुभवी, उत्तम अभिनेते आणि तितकेच सहकार्य करणारे आहेत. त्यामुळे एका यशस्वी मालिकेचा भक्कम पाया इथे रचला जातोय, याची जाणीव सतत होत राहते. ज्या दिवशी मला समजलं की निवेदिता सराफ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहेत, त्या दिवशी मी अक्षरशः मारुतीरायाकडे प्रार्थना करायला सुरुवात केली की मला ही मालिका मिळू दे. त्यांचा अनुभव, त्यांच्या अभिनयातील सहजपणा, गोडवा आणि त्यांचं मनमोहक हास्य याने गेली चाळीस वर्षे महाराष्ट्राला भुरळ घातली आहे. अशा दिग्गज अभिनेत्रींसोबत काम करण्याची संधी मिळणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्यांच्यासोबतचा प्रत्येक सीन माझ्यासाठी एक शिकण्याचा अनुभव असणार आहे. खरं सांगायचं तर, त्यांच्यासोबत फक्त एक सीन करायलाही मी प्रचंड उत्सुक होतो,” असं रोहितने सांगितलं. ‘कृष्णाईच्या लेकी’ ही मालिका येत्या 15 जूनपासून दररोज संध्याकाळी 7 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
