Armaan Kohli: ड्रग्ज प्रकरणात अरमान कोहलीला वर्षभरानंतर मोठा दिलासा

| Updated on: Sep 20, 2022 | 5:01 PM

ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी 'बिग बॉस' फेम अरमानला झाली होती अटक; तुरुंगात काढलं वर्ष

Armaan Kohli: ड्रग्ज प्रकरणात अरमान कोहलीला वर्षभरानंतर मोठा दिलासा
Armaan Kohli
Image Credit source: Instagram
Follow us on

ड्रग्ज प्रकरणात (Drugs Case) अडकलेला अभिनेता अरमान कोहली (Armaan Kohli) गेल्या वर्षभरापासून तुरुंगात आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये त्याला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) अटक केली होती. आता एक वर्षानंतर अरमानला कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. न्यायालयाने अरमानला एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे वर्षभरातून त्याची तुरुंगातून सुटका होणार आहे.

अरमान कोहलीने यापूर्वी अनेकदा अंतरिम जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र प्रत्येक वेळी न्यायालयाने त्याची याचिका फेटाळली. फेब्रुवारी 2022 मध्ये त्याने NDPS कायद्यांतर्गत 14 दिवसांसाठी अंतरिम जामीन मागितला होता, तोदेखील फेटाळण्यात आला. यादरम्यान त्याने आजारी पालकांना भेटण्यासाठी जामीन देण्याची विनंती केली होती. परंतु बचाव पक्ष आणि फिर्यादीचा युक्तिवाद ऐकल्यानंतर विशेष न्यायाधीश ए. ए. जोगळेकर यांनी अरमानचा जामीन अर्ज फेटाळला.

हे सुद्धा वाचा

गेल्या वर्षी एनसीबीने अरमानच्या मुंबईतील जुहू इथल्या घरावर छापा टाकला होता. यावेळी एनसीबीने त्याच्या घरातून काही प्रमाणात ड्रग्ज जप्त केलं होतं. ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी अरमानला अटक करण्यात आली होती.

एनसीबीच्या म्हणण्यानुसार कोहलीच्या घरातून 1.2 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आलं होतं. तर या प्रकरणातील सहआरोपींकडून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. मुख्य विक्रेता अजय राजू सिंग याची कोठडीत चौकशी केल्यानंतर अरमानला अटक करण्यात आली.

एनसीबीने अरमानला कोर्टात हजर केलं असता कोर्टाने त्याला एनसीबी कोठडी सुनावली. अरमानला एनडीपीएसच्या कलम 21(अ), 27(अ), 28, 29, 30 आणि 35 अंतर्गत अटक करण्यात आली होती.