Arshad Warsi: या सगळ्याची सुरुवात कंगनाने केली..; अर्शद वारसी स्पष्टच बोलला, नेमका वाद काय?
Arshad Warsi: अभिनेता अर्शद वारसी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत इंडस्ट्रीतील घराणेशाहीच्या मुद्द्यावर मोकळेपणे व्यक्त झाला. अभिनेत्री कंगना राणौतनेच या चर्चेची सुरुवात केली, असं अर्शदने म्हटलंय.

बॉलिवूडमध्ये ‘नेपोटिझम’ अर्थात घराणेशाहीचा मुद्दा गेल्या काही वर्षांपासून सातत्याने चर्चेत आहे. स्टारकिड्सना मिळणाऱ्या संधींपासून ते इंडस्ट्रीतील बाहेरच्या कलाकारांना करावा लागणारा संघर्ष, या मुद्द्यावर अनेक सेलिब्रिटींनी आपली मतं मांडली आहेत. अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत यांनीही या विषयावर अनेकदा बॉलिवूडमधील काही दिग्गजांवर थेट निशाणा साधला आहे. आता अभिनेता अर्शद वारसीने कंगना यांचा उल्लेख करत नेपोटिझमच्या चर्चेबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. “मी जेव्हा इंडस्ट्रीत प्रवेश केला, तेव्हा हा विषय इतका चर्चेत नव्हता. या सगळ्याची सुरुवात कंगना राणौतमुळे झाली”, असं अर्शद म्हणाला. कंगना यांनी अनेक प्रसंगी फिल्म इंडस्ट्रीमध्ये बाहेरून येणाऱ्या कलाकारांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो, यावर भाष्य केलं आहे. त्यामुळे त्यांची वक्तव्यं अनेकदा चर्चेचा आणि वादाचा विषय ठरली आहेत.
‘फिल्मज्ञान’ला दिलेल्या मुलाखतीत अर्शद म्हणाला, “मला घराणेशाहीबद्दल कोणतीही अडचण नाही. मी त्यांच्यावर खूप प्रेम करतो. जेव्हा मी पहिल्यांचा चित्रपटसृष्टीत आलो, तेव्हा हा चर्चेचा विषय नव्हता. याची सुरुवात कंगनामुळे झाली. ही कल्पना सर्वांत आधी तिनेच मांडली आणि मग हा मुद्दा वाढत गेला आणि प्रत्येकजण त्याबद्दल बोलू लागला. अर्थात या इंडस्ट्रीत घराणेशाही आहे, पण मला त्याची पर्वा आहे का? तर नाही. कारण माझं मन मला सांगतं की शेवटी तुम्ही किती प्रतिभावान आहात हेच महत्त्वाचं असतं. तेच तुम्हाला पुढे घेऊन जाईल. मला हेही समजतं की कोणत्याही स्टारकिडसाठी इंडस्ट्रीत टिकून राहणं सोपं नसतं. त्यांच्याकडून खूप अपेक्षा असतात. आज माझ्या मुलांसोबतही तेच घडताना मी पाहतोय.”
अर्शद वापर पुढे म्हणाला की, त्याला भेटणारे लोक असं गृहीत धरतात की त्याची मुलं त्याच्याइतकीच प्रतिभावान आणि उत्तम अभिनेते होतील. त्यामुळे त्याला मुलांची फार चिंता वाटते. “माझ्या मुलांचं व्यक्तिमत्त्व माझ्यापेक्षा खूप वेगळं असेलय स्टारकिड्सकडून सर्वांनाच खूप अपेक्षा असतात. मी हे मान्य करतो की इंडस्ट्रीत बाहेरच्यांपेक्षा स्टारकिड्सचे संबंध अधिक चांगले असतात, ज्यामुळे त्यांचा मार्ग सोपा होतो. पण त्यापुढील प्रवास त्यांचा बाहेरच्या व्यक्तीइतकाच खडतर असतो.”
कंगना यांनी 2017 मध्ये करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये नेपोटिझमचा मुद्दा उपस्थित केला होता. तिने करण जोहरला ‘नेपोटिझमचा ध्वजवाहक’ म्हटल्याने या विषयावर देशभरात मोठी चर्चा झाली होती. 2020 मध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर बॉलिवूडमधील नेपोटिझमचा मुद्दा आणखी तीव्र झाला. कंगना राणौत यांनी सुशांतच्या करिअरवर इंडस्ट्रीतील घराणेशाही आणि गटबाजीचा परिणाम झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर सोशल मीडियावरही स्टारकिड्स आणि फिल्म इंडस्ट्रीतील प्रभावशाली व्यक्तींविरोधात मोठी चर्चा सुरू झाली.