
काही दिवसांपूर्वी ‘आशा’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आणि चित्रपटाच्या ‘बाई अडलीये…म्हणूनच ती नडलीये’ या प्रभावी टॅगलाईनमुळे टीझरने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली. त्यात रिंकू राजगुरू साकारत असलेली आशा सेविका सायकलवर बसून गावागावांतील लोकांपर्यंत पोहोचते, अशी काही झलक दाखवण्यात आली होती. या साध्या तरीही परिणामकारक दृश्यांनीच प्रेक्षकांच्या मनात आशाच्या प्रवासाबद्दल एक वेगळं कुतूहल निर्माण केलं. याच उत्सुकतेला आणखी उधाण आलं ते, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘चालत रहा पुढे’ या प्रेरणादायी गाण्यामुळे. आशाच्या संघर्षाला ऊर्जा देणाऱ्या या गाण्याला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळत असून, अनेकांनी आशाच्या जिद्दीची आणि धैर्याची स्तुती केली आहे आणि आता प्रदर्शित झालेला दमदार ट्रेलर ही उत्सुकता आणखीनच वाढवणारा ठरत आहे.
नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा आयुष्यमान भारत – मिशन महाराष्ट्र समिती अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे, ज्येष्ठ साहित्यिक आणि ९९व्या आखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील आणि लोढा फाउंडेशनच्या अध्यक्षा मंजू मंगलप्रभात लोढा आदी मान्यवरांसह ‘आशा’ सेविका यांच्या उपस्थितीत पार पडला. महिलांच्या संघर्षांचा, त्यांच्या जिद्दीचा आणि समाजाशी सुरू असलेल्या लढ्यांचा संवेदनशील आणि वास्तववादी प्रवास ‘आशा’मधून उलगडत जातो. ट्रेलरमध्ये रिंकू राजगुरूने साकारलेल्या आशाचे अनेक पैलू दिसतात. गावोगावी लोकांच्या आरोग्याची जबाबदारी पेलणे, कुटुंबातील ताणतणावांना सामोरं जाणं, अन्यायाविरोधात ठामपणे उभे राहाणं आणि स्वतःचं ध्येय साध्य करण्याची न थकणारी धडपड. तिच्या आयुष्यातील धग, वेदना आणि तळमळ ट्रेलरमध्ये स्पष्टपणे जाणवते.
रिंकूसह सायंकित कामत, उषा नाईक, शुभांगी भुजबळ, सुहास शिरसाट, दिशा दानडे, दिलीप घारे आणि हर्षा गुप्ते यांच्या भूमिका चित्रपटाला अधिक मजबुती देतात. सामाजिक वास्तव, महिलांवर येणारे अनेक कठोर निर्णय, भावनिक दडपण आणि अस्मितेची लढाई या सगळ्यांचा प्रभावी संगम चित्रपटात दिसणार आहे. ‘आशा’ ही केवळ एका सेविकेची कथा नाही, तर सर्व स्तरांवर दररोज लढणाऱ्या लाखो महिलांची कहाणी आहे, हेच चित्रपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य ठरते.
दिग्दर्शक दिपक पाटील म्हणाले, “‘आशा’ हा केवळ एका आरोग्य सेविकेचा प्रवास नाही. ती त्या लाखो स्त्रियांची प्रतिनिधी आहे, ज्या आयुष्यभर इतरांसाठी झिजतात, स्वतःच्या भीतींवर मात करतात आणि कुठल्याही परिस्थितीत हार मानत नाहीत. या चित्रपटातून आम्ही त्या अनामिक योद्ध्यांना प्रकाशात आणू इच्छितो. तिचं सत्य, तिचा वेदनादायी तरीही प्रेरणादायी प्रवास आम्ही प्रामाणिकपणे मांडला आहे.”
दिपक पाटील दिग्दर्शित ‘आशा’चे कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, निलेश कुवर, दैवता पाटील आणि दिपक पाटील निर्माते आहेत. तर मुरलीधर चटवानी आणि रवींद्र औटी सहनिर्माते आहेत. पॅनोरमा स्टुडिओजच्या माध्यमातून प्रदर्शित होणारा हा चित्रपट नाविन्यपूर्ण कथानक आणि वास्तववादी मांडणी घेऊन भेटीला येत आहे. ‘आशा’ हा चित्रपट येत्या 19 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून, टीझर, गाणं आणि ट्रेलरमुळे आधीच चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.