तो एक पुरावा सापडताच अभिनेत्याचा खेळ खल्लास! घटनेनंतर पीडित महिलेकडून घेतला होता हिसकावून
पोलिसांकडून या महत्त्वाच्या पुराव्याचा शोध घेतला जात आहे. पीडित महिलेनं याबद्दलची माहिती पोलिसांना दिली होती. हा पुरावा अभिनेता आशिष कपूर आणि त्याच्या मित्राने तिच्याकडून हिसकावून घेतला होता, असं तिने म्हटलंय.

‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘सरस्वतीचंद्र’, ‘प्रतिज्ञा’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता आशिष कपूरला काही दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली. एका महिलेनं आशिषवर बलात्काराचा आरोप केला आहे. महिलेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करत पोलीस आशिषचा शोध घेत होते. अखेर दिल्ली पोलिसांनी त्याला पुण्यातून अटक केली. याप्रकरणात आता पोलिसांकडून एका महत्त्वाच्या पुराव्याचा शोध घेतला जातोय. हा पुरावा पोलिसांच्या हाती लागला तर आशिष याप्रकरणात चांगलाच अडकणार असल्याचं म्हटलं जात आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
ऑगस्ट महिन्यात एका महिलेनं आशिषविरोधात बलात्काराचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. दिल्लीत झालेल्या एका हाऊस पार्टीदरम्यान आशिषने बाथरुममध्ये नेऊन बलात्कार केल्याचा आरोप तिने केला आहे. त्यानंतर 11 ऑगस्ट रोजी पोलिसांनी एफआयआर दाखल करत आशिषचा शोध सुरू केला. पीडित महिला आणि आशिषची ओळख इन्स्टाग्रामद्वारे झाली होती. त्यानंतर त्याने तिला मित्राच्या घरी पार्टीसाठी बोलावलं होतं. पार्टीदरम्यान आशिषने बाथरुममध्ये नेऊन लैंगिक अत्याचार केला. इतकंच नव्हे तर त्याच्या मित्राने आणि एका महिलेनं मारहाणसुद्धा केली. या घटनेचा व्हिडीओ मोबाइलमध्ये रेकॉर्ड केल्याचं पीडितेनं जबाबात म्हटलंय.
महत्त्वाचा पुरावा कोणता?
दिल्ली पोलीस आता संबंधित महिलेच्या मोबाइल फोनचा शोध घेत आहेत. घटनेदरम्यान आशिष आणि त्याच्या मित्राने महिलेकडून तो फोन हिसकावून घेतला होता. हाऊस पार्टीदरम्यान जे पेय प्यायला देण्यात आलं होतं, त्यात काहीतरी मिसळल्याचाही आरोप पीडितेनं केला आहे. त्यानंतर बाथरुममध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. पुढे तिने असाही दावा केला आहे, की ही घटना तिच्या फोनमध्ये रेकॉर्ड करण्यात आला होता. परंतु आशिष आणि त्याच्या मित्राने तिच्याकडून तो फोन हिसकावून घेतला.
एक महिला गोंधळ घालत असल्याची तक्रार आशिष कपूरच्या एका मित्राच्या पत्नीने पोलिसांना फोन करून सांगितली होती. त्यानंतर जेव्हा महिलेला रुग्णालयात नेण्यात आलं, तेव्हा तिने तिच्यासोबत घडलेल्या घटनेचा खुलासा केला. महिलेच्या तक्रारीनुसार आधी आशिष, त्याचा मित्र, मित्राची पत्नी आणि इतर दोघांवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु नंतर पीडित महिलेनं तिचा जबाब बदलला आणि फक्त आशिषनेच लैंगिक अत्याचार केल्याचं सांगितलं. त्यामुळे इतरांवरील गुन्हे मागे घेण्यात आले. दरम्यान याप्रकरणी कोर्टाकडून परवागनी घेतल्यानंतर आशिषची पोटेन्सी टेस्ट करण्यात आली. त्याला 14 दिवस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
“पीडित महिलेचा मोबाइल फोन शोधण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तो फोन आशिष आणि त्याच्या मित्राने हिसकावून घेतल्याचा आरोप महिलेनं केला आहे. या प्रकरणातील तपासासाठी हा फोन अत्यंत महत्त्वाचा आहे”, अशी माहिती पोलिसांनी दिली.
