तू मूर्खपणा करतेस, म्हणूनच..; रणवीरला पाठिंबा देणाऱ्या कंगना यांच्यावर भडकले FWICE चे मुख्य सल्लागार

'भारत भाग्य विधाता' या चित्रपटाच्या कार्यक्रमात पत्रकारांनी कंगना यांना रणवीरविरोधातील बंदीवरून प्रश्न विचारला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना कंगना यांनी म्हटलं होतं की, त्यांच्यावर संपूर्ण इंडस्ट्रीनेच बंदी घातली आहे.

तू मूर्खपणा करतेस, म्हणूनच..; रणवीरला पाठिंबा देणाऱ्या कंगना यांच्यावर भडकले FWICE चे मुख्य सल्लागार
Kangana Ranaut and Ranveer Singh
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 04, 2026 | 8:11 AM

अभिनेत्री रणवीर सिंहविरोधातील असहकाराचे निर्देश अखेर ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज’कडून (FWICE) बुधवारी मागे घेण्यात आले. ‘डॉन 3’ या चित्रपटातून अचानक माघार घेतल्यानंतर रणवीरविरोधात हे निर्देश जारी करण्यात आले होते. असहकाराच्या निर्देशाबाबत इंडस्ट्रीतल्या अनेक कलाकारांनी विरोध केला होता. इतकंच काय तर जेव्हा तुमची प्रतिष्ठा वाढते, तेव्हा तुमचे विरोधकही वाढतात, अशी प्रतिक्रिया खासदार आणि अभिनेत्री कंगना राणौत यांनी दिली होती. रणवीरविरोधातील असहकाराच्या निर्देशाबाबत प्रतिक्रिया देताना कंगना यांनी म्हटलं होतं, “माझ्यावर तर संपूर्ण इंडस्ट्रीने बंदी घातली आहे.” यावर आता फेडरेशनचे मुख्य सल्लागार अशोक पंडित यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. या विषयाबद्दल कंगना यांना किती समजलंय, यावरच त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

अशोक पंडित यांची प्रतिक्रिया

अशोक पंडित पत्रकार परिषदेनंतर माध्यमांशी बोलताना म्हणाले, “फेडरेशनच्या भूमिकेचा मोठ्या प्रमाणावर गैरसमज झाला आहे, कारण अनेकजण या प्रकरणातील तथ्यांऐवजी फक्त मथळ्यांवर प्रतिक्रिया देत आहेत. इंडस्ट्रीमधल्या अनेकांनी आम्हाला थेट शिवीगाळ करायला सुरुवात केली आहे. काल कंगना यांनीसुद्धा काहीतरी म्हटलं. त्यांना मुळात संपूर्ण मुद्दाच कळला नाहीये आणि लोक फक्त टीका-टिप्पणी करण्यात व्यस्त आहेत. कंगना यांनी असंही म्हटलं होतं की इंडस्ट्रीने माझ्यावरही बंदी घातली आहे. मी तर म्हणतो की, तुम्ही मूर्खपणा करता, म्हणूनच तुमच्यावर बंदी घातली आहे. मला काहीच फरक पडत नाही. इथे इंडस्ट्रीचा एक मोठा मुद्दा आहे. तुम्हाला तो मुद्दा काय आहे, हेसुद्धा माहीत नाही. तुम्ही फक्त काहीही बोलत आहात. आम्ही रणवीरच्या विरोधात नाही. जे घडलंय, त्याबद्दल आम्ही बोलत आहोत.”

यावेळी अशोक पंडित यांनी पुढे स्पष्ट केलं की फेडरेशनची भूमिका रणवीर सिंहला लक्ष्य करणारी नाही. चित्रपटाच्या निर्मितीमध्ये सहभागी असलेले निर्माते, तंत्रज्ञ, कामगार आणि इतरांवर होणाऱ्या परिणामांबद्दलच्या चिंतेतून ही भूमिका घेण्यात आल्याचं ते म्हणाले. लोकांनी या वादावर सार्वजनिकरित्या मत व्यक्त करण्यापूर्वी फेडरेशनच्या कृतीमागील पार्श्वभूमी आणि परिस्थिती आधी समजून घेतली पाहिजे, यावर अशोक पंडित यांनी जोर दिला.

काय म्हणाल्या होत्या कंगना?

“हे पहा, जर तुम्ही मला विचारत असाल, तर माझ्यावर सगळ्यांनीच बंदी घातली आहे (हसतात). मी यावर इतकंच म्हणेन की जेव्हा तुमची प्रतिष्ठा वाढते, तेव्हा तुमचे शत्रूही वाढतात. असं होऊच शकत नाही की तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि तुमचे शत्रू नसतील. तुमच्या विरोधकांची संख्या वाढते. पण त्यामुळे तुम्ही अजिबात घाबरू नये”, अशी प्रतिक्रिया कंगना यांनी दिली होती.

Follow Us