
‘लाफ्टर शेफ्स 2’ या शोमध्ये झळकणारी प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रीम शेख सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. नेटकरी तिला जोरदार ट्रोल करत आहेत, तिच्यावर राग व्यक्त करत आहेत. अशातच निर्माते अशोक पंडित यांनीसुद्धा रीमची चांगलीच शाळा घेतली आहे. यामागचं कारण म्हणजे रीम शेखचा अज्ञानीपणा. नुकतंच पापाराझींनी तिला अहमदाबादमधील विमान दुर्घटनेबद्दल प्रतिक्रिया देण्यास सांगितलं, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर हास्य दिसून आलं. रीमचा हाच व्हिडीओ पापाराझींनी सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर त्यावर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली.
अभिनेत्री रीम शेखला ‘लाफ्टर शेफ्स 2’च्या सेटवर पापाराझींनी पाहिलं. त्यांनी तिला फोटोसाठी पोझ देण्याची विनंती केली. जेव्हा रीम त्यांच्यासमोर आली, तेव्हा एकाने विचारलं, “कालच्या घटनेबद्दल काय म्हणशील?” हे ऐकून रीमच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्हाचे भाव दिसतात. ती पापाराझींना प्रतिप्रश्न विचारते की, “का, काल काय झालं होतं?” रीमला घटनेविषयी काहीच कल्पना नसल्याचं पाहून एक पापाराझी म्हणतो, “बाप रे!” तेव्हा इतर काही जण तिला अहमदाबादमधील विमान दुर्घटनेबद्दलची माहिती देतात. ते ऐकल्यानंतरही रीम काहीच म्हणत नाही. ती फक्त पापाराझींना हसत फोटोसाठी पोझ देते आणि तिथून निघून जाते. तिच्या या वागणुकीबद्दल नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
रीमचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून त्यावर आता निर्माते अशोक पंडित यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. स्वत:चा व्हिडीओ शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, “कोणी इतकं असंवेदनशील आणि अमानवी कसं असू शकतं? एक तरुण अभिनेत्री, जिचं आयुष्य कदाचित तिच्या व्हॅनिटी व्हॅन, मेकअप आणि कॉस्च्युम यांच्याभोवतीच फिरतं. ही अशी वागतेय, जसं की ती दुसऱ्या ग्रहावर राहते की काय? आपल्या या मूर्खपणाबद्दल तिने माफी मागितली पाहिजे.”
याविषयी ते व्हिडीओत पुढे म्हणाले, “मित्रांनो.. असं होऊ शकतं की या पृथ्वीवर, या देशात किंवा परदेशात असा एखादा प्राणी असेल ज्याला याबद्दल माहीत नसेल की एअर इंडियाचं विमान कोसळलं होतं. मी तुम्हाला अशा व्यक्तीशी भेट करून देतो, जी या घटनेबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ आहे. विमान क्रॅश झालं आणि त्यात इतक्या लोकांनी आपले प्राण गमावले, हे तिला माहितच नाही. यांचं आयुष्य अद्याप व्हॅनिटी व्हॅनच्या बाहेर पडलंच नाही बहुधा.”