
‘लगान’, ‘स्वदेस’, ‘जोधा अकबर’, ‘पानिपत’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर यांच्या मुलाचा लग्नसोहळा नुकताच थाटामाटात पार पडला. गोवारिकर यांचा मुलगा कोणार्क गोवारिकरने नियती कनकियाशी लग्न केलं. 2 मार्च रोजी हा लग्नसोहळा पार पडला. लग्नानंतर आयोजित रिसेप्शन पार्टीत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित होते. या लग्नसोहळ्यातील विविध फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यापैकी एका व्हिडीओने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलंय. हा व्हिडीओ आशुतोष गोवारिकर यांच्या डान्सचा आहे. लेकाच्या संगीत कार्यक्रमात गोवारिकरसुद्धा स्टेजवर मनसोक्त थिरकले.
या व्हायरल व्हिडीओमध्ये काही जण गोवारिकर यांना स्टेजवर डान्ससाठी घेऊन जाताना दिसत आहेत. त्यानंतर गोवारिकरसुद्धा त्यांच्याच ‘लगान’ या चित्रपटातील ‘मितवा’ या गाण्यावर ठेका धरतात. यावेळी त्यांनी निळ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती. गोवारिकर स्टेजवर डान्स करत असताना उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनीही लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
‘बेस्ट व्हिडीओ’, असं एकाने लिहिलं. तर ‘वाह.. अनपेक्षितपणे हा व्हिडीओ खूप छान आहे’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘मुलाच्या लग्नाचा आनंद वडिलांच्या चेहऱ्यावर दिसतोय’, असंही नेटकऱ्यांनी लिहिलं आहे. ‘गोवारिकर इतकं छान नाचतात हे माहीत नव्हतं’, अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर पहायला मिळत आहेत.
आशुतोष गोवारिकर यांचा मुलगा कोणार्क हा सध्या त्याच्या वडिलांसोबतच सहाय्यक म्हणून काम करतोय. अद्याप त्याने बॉलिवूडमध्ये अभिनेता किंवा दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं नाही. त्याची पत्नी नियती कनकिया ही कनकिया बिल्डर्सचे मालक आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील दिग्गज रेशेश बाबूभाई कनकिया यांची मुलगी आहे. कोणार्क आणि नियतीच्या रिसेप्शनला अनेक दिग्गज उपस्थित होते. आमिर खान, विद्या बालन, सोनाली बेंद्रे, पूजा हेगडे, चंकी पांडे, शाहरुख खान यांनी रिसेप्शनला हजेरी लावली होती.
आशुतोष गोवारिकर हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील नामवंत दिग्दर्शक आहेत. ‘स्वदेस’, ‘लगान’, ‘जोधा अकबर’ हे त्यांचे चित्रपट विशेष गाजले होते. 2019 मध्ये त्यांचा ‘पानिपत’ हा बिग बजेट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यामध्ये अर्जुन कपूर, क्रिती सनॉन आणि संजय दत्तने मुख्य भूमिका साकारल्या होत्या.