
अभिनेत्री बॉबी डार्लिंग सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. बॉबीने तिच्या आयुष्यात बराच संघर्ष केला असून नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने काही धक्कादायक खुलासे केले आहेत. काही वर्षांपूर्वी बॉबीने लिंगबदल शस्त्रक्रिया केली होती. दहावीत असताना तिला याची जाणीव होऊ लागली होती की, जरी तिचं शरीर पुरुषाचं असलं तरी ती आतून एक मुलगी आहे. सध्याच्या काळात लिंगबदल शस्त्रक्रिया अगदी सहज होत असली तरी त्यासाठी येणारा खर्च काय असतो, त्यानंतर शरीरात नेमके काय बदल होतात आणि सर्जरीनंतर पार्टनरसोबत शारीरिक संबंध कधी ठेवता येतात, याविषयी बॉबीने सांगितलं आहे.
आरजे सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या या मुलाखतीत बॉबीने सांगितलं की 2015 मध्ये लग्नापूर्वी तिने लिंग बदललं होतं. काही वर्षांपूर्वी ती पती रमणिक शर्मापासून विभक्त झाली. याविषयी ती म्हणाली, “बँकॉकमध्ये माझ्यावर लिंग बदलाची शस्त्रक्रिया झाली. या शस्त्रक्रियेसाठी मला 10 लाख रुपये खर्च आला होता. सर्जरी करण्याच्या जवळपास सहा महिने आधीपासूनच मला हार्मोनल गोळ्या घ्यावा लागत होत्या. हार्मोन्सच्या या गोळ्या दिवसातून तीन वेळा घ्यावा लागतात. त्यानंतर जानेवारीत माझ्यावर सर्जरी झाली. ही शस्त्रक्रिया जवळपास चार ते पाच तास चालली होती.”
“तुम्हाला चालत राहावं लागतं. तुम्ही आराम करू शकत नाही. त्यानंतर जेव्हा तुम्ही मूत्रविसर्जन करता, तेव्हा संपूर्ण प्रक्रिया सुरू होते. त्यानंतर ते तुम्हाला एक आर्टिफिशिअल (कृत्रिम) ऑर्गन देतात. गुप्तांगाचा आकार व्यवस्थित राहावा, यासाठी दररोज ते इन्सर्ट करावं लागतं. हे कमीत कमी सहा महिन्यांपर्यंत दररोज करायचं असतं. डायलेशनची ही प्रक्रिया सहा महिन्यांपर्यंत दररोज केल्यानंतर तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत इंटिमेट होऊ शकता. मी माझी सर्जरी बँकॉकमध्ये केली होती आणि तिथे बहुतांथ सर्जरी यशस्वी होतात”, असं तिने पुढे सांगितलं.
काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत बॉबी डार्लिंगने तिच्या पूर्व पतीवर आरोप केले होते. ‘बॉलिवूड ठिकाना’ला दिलेल्या मुलाखतीत ती रडत रडत म्हणाली होती, “ज्या व्यक्तीवरील प्रेमापोटी मी माझं सेक्स चेंज ऑपरेशन केलं, त्यानेच माझी फसवणूक केली. त्याने मला फेसबुकवर रिक्वेस्ट पाठवली होती. मी एक रोड कॉन्ट्रॅक्टर आहे, असं त्याने मला सांगितलं होतं. पण ते सगळं खोटं होतं. तो घोटाळेबाज निघाला.” बॉबीने ‘ताल’, ‘जीना सिर्फ मेरे लिए’, ‘चलते-चलते’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे.