
भारतीय सुपरहिरो म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सोनू सूद हा कायमच चर्चेत असतो. सर्वसामान्यांच्या मनात त्याने घर केले आहे. सध्या सोशल मीडियावर सोनू सूदचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने चक्क सोसायटीमध्ये आलेला साप हाताने पकडला असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. अनेकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत.
काय आहे व्हिडीओ?
सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सोनू सूद सांगताना दिसत आहे की त्याच्या सोसायटीमध्ये साप शिरला होता. तो त्याने पकडला आहे. हा साप विषारी नाही. तसेच त्याने साप पकडत असताना चाहत्यांना इशारा दिला आहे की असे करताना तुम्ही सर्वात आधी तज्ज्ञांची मदत घ्यावी. सोनू सूदने हाताने सापाला पकडले आहे आणि तो साप कापडी पिशवीत टाकताना दिसत आहे. एवढेच नाही तर त्याने हा साप सुरक्षित ठिकाणी सोडण्यासही सांगितले आहे.
वाचा: ज्याला हिंदी शिकायची त्याने जरुर शिका, पण…; स्वप्नील जोशीने मांडलं परखड मत
सोनू सूद व्हिडिओमध्ये सांगताना दिसला की त्याने साप पकडण्याचे प्रशिक्षण घेतले आहे. त्यामुळे चाहत्यांनी स्वतः असे करू नये. इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, “हर हर महादेव.”
नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया
सोनू सूदचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडीओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले, “रियल हिरो, हर हर महादेव, भगवान तुम्हाला सुखरूप ठेवो.” दुसऱ्या युजरने लिहिले, “सोनू भाई माणसांनंतर आता प्राण्यांनाही घरी सोडत आहेत. सोनू भाईसाठी आदर.” तर अनेक चाहत्यांनी त्यांना खरा हिरो म्हटले आहे.
सोनू सूदच्या कामाविषयी
विशेष म्हणजे, सोनू सूद नेहमीच सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना आणि अनेक लोकांना मदत करताना दिसतो. कोरोनाकाळातही त्याने अनेकांना घरी पोहोचण्यासाठी मदत केली होती. त्यासाठी नुकताच सोनू सूदला मिस वर्ल्ड ह्यूमॅनिटेरियन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सोनू सूद शेवटचा ‘फतेह’ या अॅक्शन चित्रपटात दिसला होता, ज्याचे लेखन आणि दिग्दर्शन त्याने स्वतः केले होते. या चित्रपटात नसीरुद्दीन शाह, जॅकलिन फर्नांडिस, विजय राज आणि दिब्येंदु भट्टाचार्य यांनी भूमिका केल्या होत्या.