Fact Check: वैजयंती माला यांच्या निधनाच्या बातमी बाबत मुलाचा खुलासा, म्हणाला ‘त्या अफवा…’
दिग्गज ज्येष्ठ अभिनेत्री वैजयंती माला यांच्या निधनाची अफवा सुरु आहे. यावर आता त्यांच्या मुलाने प्रतिक्रिया दिली आहे.

बॉलिवूडमधील दिग्गज ज्येष्ठ अभिनेत्री वैजयंती माला यांचे वयाच्या ९१व्या वर्षी निधन झाल्याची बातमी सर्वत्र परसरली होती. मात्र, या सगळ्या अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. अभिनेत्रीच्या मुलाने स्वत: यावर प्रतिक्रिया दिली आहे. वैजयंती माला या ठणठणीत असून त्यांना काही झालेले नाही असे मुलाने म्हटले आहे.
वैजयंती माला यांचा मुलगा सुचिंद्र बाली यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला एक पोस्ट शेअर केली आहे. ‘डॉ. वैजयंतीमाला बाली यांची प्रकृती अतिशय उत्तम आहे आणि त्यांच्याविषयी पसरवल्या जाणाऱ्या बातम्या या खोट्या आहेत. कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी त्या माहितीचा स्त्रोत पाहा’ या आशयाची पोस्ट त्यांनी केली आहे. तसेच त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असे सांगितले आहे.

जानेवारी महिन्यात वैजयंती माला यांनी चैन्नईमध्ये भरतनाट्यम सादर केले होते. वयाच्या ९१व्या वर्षी त्यांचा डान्स परफॉर्मन्स पाहून सर्वजण चकीत झाले होते. त्यांची प्रकृती एकदम ठणठणीत असल्याचे तेव्हाही नेटकऱ्यांनी म्हटले होते.
वैजयंती माला यांचे नाव दिग्गज अभिनेत्रींच्या यादीमध्ये घेतले जाते. वैजयंती माला या अभिनयाबरोबरच त्या शास्त्रीय नृत्यासाठीसुद्धा चर्चेत असतात. मोठ्या पडद्यावर स्विम सूट परिधान करणाऱ्या पहिल्या दाक्षिणात्य अभिनेत्री, तीन मुलांच्या वडिलांसोबत लग्न, त्याचबरोबर दिलीप कुमार यांच्यासोबत त्यांचे नाव जोडले गेले होते. वैजयंती माला यांना जेव्हा चित्रपटांमध्ये कास्ट करण्यात आले तेव्हा निर्मात्यांना त्यांच्यावर विश्वास नव्हता. पण अभिनय कौशल्यावर त्यांनी सर्वांची मने जिंकली. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. आता वैजयंती माला यांच्या निधनाच्या अफवा फसरल्या होत्या. पण त्यांच्या मुलाने यावर प्रतिक्रिया देत ही खोटी माहिती असल्याचे म्हटले आहे.
