Arijit Singh : अरिजीत सिंगच्या चाहत्यांसाठी मोठी खुशखबर ! ‘तुम ही हो’चा आवाज पुन्हा थेट स्टेजवर ! 9 शहरांत रंगणार भव्य कॉन्सर्ट, तुमचं शहर यात आहे का?
अरिजीत सिंगने त्याच्या इंडिया टूरची घोषणा केली आहे. भारतातल्या अनेक शहरांमध्ये तो त्याची भव्य कॉन्सर्ट करणार आहे. कोणकोणती आहेत ती शहरं, तुमच्या शहराचं आहे का त्यात नाव ?

तरूणाईपासून ते लहान-मोठ्यांपर्यंत सर्वांना आपल्या आवाजाने वेड लावणारा, विख्यात गायक अरिजीत सिंगच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. त्याने भारतातल्या 9 शहरांमध्ये होणाऱ्या इंडिया टूरची घोषणा केली आहे.आपल्या संगीत कारकिर्दीतील 20 वर्षांचा प्रवास या भव्य टूरच्या माध्यमातून साजरा करण्यासाठी सज्ज झाला आहे . भारतातील त्याची ही सर्वात मोठा टूर असणार असून, जानेवारी 2027 ते मे 2027 या कालावधीत तो देशातील विविध शहरांमध्ये लाईव्ह परफॉर्म करणार आहे. यामध्ये ‘अगर तुम साथ हो’, ‘तुम ही हो’, ‘विदा करो’ आणि यासारखी अनेक चार्टबस्टर गाणी, अरिजीत त्याच्या चाहत्यांसाठी लाईव्ह सादर करणार आहे. प्लेबॅक सिंगिंगच्या करिअरमधून निवृत्ती घेत असल्याचं अरिजीतने यावर्षी जानेवारीमध्ये जाहीर केलं होतं, त्याच्या या घोषणेने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. सोलो आर्टिस्ट म्हणून अनेक गोष्टी एक्सप्लोअर करायच्या असल्याचं त्याने नमूद केलं होतं.
कॉन्सर्टबद्दल काय म्हणाला अरिजीत ?
आपल्या 20 वर्षांच्या संगीत प्रवासाबद्दल बोलताना अरिजीत सिंहने चाहत्यांचे आभार मानले. त्याने म्हटले की, या संपूर्ण प्रवासात श्रोते आणि चाहत्यांनी त्याच्या गाण्यांना आपल्या आयुष्याचा एक भाग बनवलं, हीच त्याच्यासाठी सर्वात मोठी गोष्ट आहे. अरिजीत म्हणाला, “संगीताच्या जगातल्या 20 वर्षांच्या या प्रवासासाठी मी खूप आभारी आहे. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे नेहमी श्रोते आणि लोक होते, ज्यांनी या गाण्यांना स्वतःच्या जीवनात स्थान दिलं. मी खरंच पूर्ण देश फिरून त्या प्रेमाचा स्टेजवरून अनुभव घेण्यासाठी उत्सुक आहे. अशी खूप सारी गाणी आहेत, खूप साऱ्या आठवणी आहेत आणि खूप सारे लोक आहेत, ज्यांना भेटण्यासाठी मी आतुर आहे.”
कोणत्या शहरांमध्ये होणार कॉन्सर्ट?
अरिजीत सिंहचा ही टूर देशातील प्रमुख शहरांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. या दौऱ्यात तो अहमदाबाद, चंदीगड, जयपूर, मुंबई, बंगळुरू, नवी दिल्ली, पुणे आणि इंदूर यांसारख्या शहरांमध्ये स्टेडियम-लेव्हल कॉन्सर्ट करणार आहे. या भव्य कार्यक्रमांमुळे अरिजीतच्या चाहत्यांना त्याचा लाईव्ह परफॉर्मन्स पाहण्याची आणि ऐकण्याची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे, प्रेक्षकांना कलाकाराच्या अधिक जवळचा अनुभव मिळावा यासाठी कॉन्सर्टसाठी खास मल्टी-लेव्हल स्टेज तयार करण्यात येणार आहे. या स्टेजवरून एक रॅम्प थेट प्रेक्षकांच्या गर्दीत जाणार असल्याने अरिजीतला चाहत्यांच्या आणखी जवळून परफॉर्म करता येणार आहे.
तिकीट कुठे मिळणार ?
या टूरची निर्मिती आणि प्रमोशन टीम इनोव्हेशन्सकडून करण्यात येत आहे. कॉन्सर्टची तिकिटे केवळ thumpN या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आलं आहे.
हाय-टेक सेटअप आणि 360-डिग्री साउंडचा अनुभव
अरिजीत सिंहच्या ही टूर फक्त केवळ म्युझिकल परफॉर्मन्सपुरते मर्यादित नसून तो एक भव्य ऑडिओ-व्हिज्युअल अनुभव बनले, याची तयारी करण्यात आली आहे. कॉन्सर्टमध्ये 360-डिग्री स्पॅटिअल ऑडिओ, काइनेटिक LED फिक्स्चर्स, पॅनोरॅमिक स्क्रीन, लेझर अरेंजमेंट्स आणि स्टेडियम-लेव्हल पायरोटेक्निक्स यांसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. यामुळे चाहत्यांना अरिजीतची गाणी लाईव्ह ऐकण्यासोबतच मोठ्या प्रमाणावर तयार करण्यात आलेला ऑडिओ-व्हिज्युअल अनुभवही मिळणार आहे. स्टेज डिझाइनपासून साउंड सिस्टमपर्यंत प्रत्येक गोष्टीवर विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.